भाषेतील लोकोपयोगी, ज्ञानसंवर्धक आणि माहितीप्रधान ग्रंथांचे भाषांतर करण्याची भूमिका महाराजांनी अगदी १८८७ पासून 'घेतली असल्याचे पुरावे सापडतात. १८८० च्या दशकात मराठीमध्ये स्वतंत्र अभ्यास संशोधकीय लेखक फारच कमी असल्यामुळे जगातील आधुनिक ज्ञान आपल्या प्रजेला मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणून महाराज भाषांतराकडे पाहात होते. १८८७ मध्ये महाराज जेव्हा आपल्या पहिल्या परदेशवारीवर युरोपला गेले तेव्हा तेथून त्यांनी कॅसलची 'Dictionary of Cookery' हा ग्रंथ मराठीत भाषांतर करण्याचे आदेश दिवाणांना दिले होते.
सयाजीरावांनी भाषांतर शाखेची पायाभरणी १८८८ पासूनच सुरू केली होती. शास्त्रीय शिक्षणाची पुस्तके गुजराथी भाषेत तयार करण्यासाठी १८८८ मध्ये महाराजांनी ५० हजार रु. मंजूर करून प्रो. गज्जर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. गज्जर यांनी विविध तांत्रिक व वैज्ञानिक विषयांची पुस्तके गुजराथी व मराठी अशा देशी भाषेतूनच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी 'श्रीसयाजीज्ञानमंजूषा' ही शास्त्रीय ग्रंथमाला सुरू केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक अडचणी दूर होऊन प्रत्येक विषयाचे परिपूर्ण ज्ञान त्यांना सहजरित्या घेता येऊ लागले. या मालेतील बाळाजी प्रभाकर मोडक यांच्या 'सृष्टीशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र' (१८९३) या ग्रंथामध्ये 'ध्वनीशास्त्र' व 'प्रकाशशास्त्र' या दोन शास्त्रांचे वर्णन केले आहे. या दोन