पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिली भेट
 धर्मानंद कोसंबी व सयाजीराव महाराज यांची पहिली भेट कलकत्ता येथे डिसेंबर १९०६ मध्ये झाली. त्यावेळी महाराज कलकत्ता औद्योगिक परिषदेसाठी आले होते. ही भेट श्रीयुत सत्येंद्रनाथ टागोर आय. सी. एस. यांच्यामुळे शक्य झाली होती. प्रथम कोसंबी टागोरांसोबत जेव्हा महाराजांना भेटायला गेले त्यावेळी महाराजा बाहेर गेले असल्याने त्यांची महाराजांशी भेट होऊ शकली नाही. महाराजांचे प्रायव्हेट सेक्रेटरी मनुभाई मेहता यांची भेट घेऊन कोसंबींना परतावे लागले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी मनुभाई मेहता यांनी कोसंबींची आणि महाराजांची भेट घडवून आणली. या भेटीवेळी मात्र कोसंबींना पुरेसा वेळ देणे महाराजांना शक्य झाले नाही. या भेटीत महाराज कोसंबींना म्हणाले, 'तुम्ही एकदा बडोद्याला या. पुष्कळ गोष्टी तुमच्याशी मला बोलावयाच्या आहेत.' वेळेअभावी झालेल्या या प्राथमिक भेटीत महाराजांनी कोसंबींना विस्तृत भेटीसाठी बडोद्याला बोलाविले.

 १९०७ मध्ये कोसंबी बडोद्याला पोहोचले तेव्हा महाराज शिकारीवर गेले होते. त्याच दरम्यान महाराजांच्या चुलतीचे निधन झाले. त्यामुळे ८-१० दिवस कोसंबींना वाट पाहावी लागली. दरम्यान महाराजांना कोसंबी बडोद्यात आल्याचे कळताच

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / ८