पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 याउलट गोविंद काणे यांचे बंधू डॉ. काणे व विनायकराव ओक यांनी केळुसकरांच्या बुद्ध चरित्राची प्रशंसा केली. केळुसकरांचे हे बुद्धाचे चरित्र वाचूनच डॉ. आनंदराव नायर यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि त्या धर्माची दीक्षा घेतली. एका सभेत बोलताना डॉ. नायर यांनी 'केळुसकरकृत बुद्ध चरित्रापासून आपण स्फूर्ती घेऊन बौद्ध धर्माच्या प्रचारास वाहून घेतल्या'चे स्पष्ट केले होते.

 एकूणच कोसंबींनी बौद्ध धर्माला दिलेले योगदान जसे महत्त्वाचे आहे तसेच सयाजीरावांनी या कामात कोसंबींना दिलेले पाठबळसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण राज्यकर्त्यांचा पाठिंबा हा कोणत्याही कामाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा असतो. सयाजीरावांनी जगभराच्या सर्वच सकारात्मक कामांना कोणताही भेदभाव न करता आयुष्यभर पाठबळ दिले. यामागे सयाजीरावांची मानव कल्याणाची वैश्विक दृष्टी प्रतीत होते. कोसंबीच्या बौद्ध कार्याला महाराजांनी दिलेले पाठबळ कोसंबी, महाराष्ट्र, बौद्ध धर्म आणि बाबासाहेबांचे धर्मांतर यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठबळ देणारे ठरले एवढे मात्र निश्चित.

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / २१