पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांनी घालू नये. मी कोठे असलो तरी बौद्ध धर्माचे ज्ञान आमच्या महाराष्ट्र बांधवांना करून देणे, या माझ्या कर्तव्यास मुकणार नाही. तेव्हा पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी राहून माझे काम मला करू द्यावे व निर्वाहापुरती बडोदे सरकारकडून मला मदत व्हावी.'
सयाजीरावांच्या शिष्यवृत्तीवर महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रसार

 कोसंबींच्या या निवेदनावर महाराजांनी त्यांचे मत स्पष्टपणे मांडले नाही. त्यानंतर लगेचच महाराज पुण्यास निघून गेले आणि कोसंबीही कलकत्याला गेले. त्यानंतर पंधरा-वीस दिवसांनी कोसंबींना महाराजांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीमार्फत तातडीची तार आली. या तारेतून कोसंबींना एक हुकूम प्राप्त झाला. तो हुकूम पुढीलप्रमाणे होता, 'तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहरी राहात असाल तर तुम्हाला बडोदे सरकारांतून दरमहा ५० रुपये मिळतील, व ही मदत तीन वर्षेपर्यंत चालू राहील. मात्र वर्षातून एखादे पुस्तक बडोदे सरकारसाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे.' ही तार कोसंबींपर्यंत उशिराने पोहोचली. ही तार पोहोचताच सेक्रेटरींकडून 'पहिल्या तारेचे उत्तर ताबडतोब पाठवावे' अशी दुसरी तार आली. यावरून कोसंबींना महाराजांची इच्छा लक्षात आली. त्यामुळे कोसंबींनी कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू हरिनाथ देव जस्टिस मुकर्जी यांना त्यांचा उद्देश सांगितला आणि सयाजीराव महाराजांनी देऊ केलेले वेतन

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / ११