पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजरोसपणे बडोदा राज्यात सुरू असल्याचे महाराजांच्या लक्षात आले. मुलांना अगदी बालपणीच देशोधडीस लावणारी जैन दीक्षा कायद्याने बंद करण्यापूर्वी धर्मशास्त्रात याचा आधार काय हे तपासण्यासाठी एक कमिटी नेमली. पुढे 'संन्यास दीक्षा निर्बंध' नावाने बडोदा राज्यात कायदा केला. या कायद्यानुसार कोणत्याही मुलाला दीक्षा देणे हे शासन-पात्र ठरवले गेले. यामुळे धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या गुंडगिरीला आणि धर्म ठेकेदारांना आपोआपच लगाम बसला.

 इतर धर्माप्रमाणे इस्लाम धर्मात काही अनिष्ट बाबी घुसडवून अज्ञानी सामान्य जनतेची पिळवणूक चालली होती. यामध्ये महाराजांनी लक्ष घालून अंधश्रद्धा कायद्याने बंद केल्या. बडोदा सरकारमधून इस्लाम धर्मीयांसाठी दिलेल्या देणग्यांचा उपयोग सामान्यांसाठी पारदर्शीपणे होण्यासाठी वर उल्लेखलेला 'वक्फ कायदा केला. त्यांनी धर्म आणि लोकभावना यांचा संयोग करताना कधीही धर्मगुरूंचा रोष पत्करला नाही. फक्त मंदिरे किंवा इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे बांधण्यासाठीच महाराजांनी मदत केली नाही; तर मुस्लिम प्रार्थनास्थळे नवीन उभारताना किंवा उद्धार करताना मोठमोठ्या देणग्या दिल्या. जानेवारी १९१३ मध्ये बडोदा येथील जुम्मा मशिदीसाठी धर्मार्थ देणगी ४५,००० रु. दिले. हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. देशभरातील मुस्लिम समुदायांच्या महाविद्यालयांना भेटी देऊन सत्पात्री देणग्या दिल्या. कैरो येथील प्राच्यविद्या संस्थेचे प्रा. अर्थर जेनिफ्री यांनी

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / १६