पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चर्चा करून यावर रीतसर मार्ग काढला. परिणामस्वरूप, सर्व पुरोहितांना सर्व विधी वेदोक्त पद्धतींनी करणे भाग पडले. यावेळी asोदा आणि बडोद्याबाहेर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली; परंतु टीकेला उत्तर न देता प्रकरण महाराजांनी तडीस नेले. धर्मसुधारणेच्या कामी सयाजीराव महाराज स्वतःच्या प्रज्ञेचा स्वतंत्रपणे वापर करत होते.

 सयाजीराव महाराज बोले तैसा चाले याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी एक सत्ताधीश म्हणून समाजसुधारणेसाठी आणि धर्माच्या नावाखाली अनिष्ट चालींना बळी पडणाऱ्या प्रजेसाठी काय केले याचा विचार महत्त्वाचा ठरेल. त्यांना एक राज्यकर्ता म्हणून धर्म आणि सामाजिक सुधारणेसाठी पटापट कायदे करून, सत्तेच्या धाकाने सुधारणा करता येत होत्या; परंतु या सुधारणा दीर्घकालीन होतीलच याची शाश्वती नसते. महाराज लोकशाहीचे पालनकर्ता असल्याने कोणतीही सामाजिक सुधारणा करताना प्रजेचे मत विचारात घेत होते. केलेल्या कायद्यात कालानुरूप बदल करत होते. समाजसुधारणेसाठी किंबहुना धर्मातील अडगळ चाली बंद करण्यासाठी पुढील कायदे केले. सर्वप्रथम धर्मखात्याची स्थापना केली. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, अनेकपत्नीत्वनिषेध, जातिभेदनिवारण, पोटजातींतील विवाह, परदेशगमनाला मोकळीक, सहभोजन, अस्पृश्योद्धार, दारूबंदी यासाठी अनेक कायदे केले. त्याचबरोबर सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण (१८९२ आणि १९०६), वेदोक्त विधी

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / १२