पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिषदेच्या सत्राची सुरुवात ७ सप्टेंबर १९३१ ला झाली. महाराजांनी या परिषदेच्या २१ व्या बैठकीमध्ये छोटेसे भाषणही केले. २५ सप्टेंबर १९३१ ला श्रीमती सरोजिनी नायडू यांच्यासह महात्मा गांधींनी लंडनमध्ये महाराजांची भेट घेतली. महाराजांनी युरोपीयन गृहस्थ श्री. आर. एम. टिसडेल यांची नेमणूक एडीसी म्हणून तर श्री. रोमन यांची नियुक्ती बडोदा महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून केली. सयाजीरावांनी झुरीच येथील प्रसिद्ध तंत्रशिक्षण महाविद्यालयाला भेट दिली.
 गस्टॉडमधील वास्तव्यात सयाजीरावांनी ५६ आदेश पारित केले. त्याचबरोबर लहान बंधू संपतरावांना कौटुंबिक आठवणींचे पुस्तक लिहिण्याची विनंती केली. याचवेळी महाराजांनी कायदा शब्दकोश तयार करण्याचा, सुक्तीसंग्रह करण्याचा, नीतिशास्त्राच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जोन्सच्या 'नीतिशास्त्राचे तत्व' हे पुस्तक पूर्ण करण्याचे आदेश दिले. २७ मार्च १९३२ ला महाराजांनी लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या केंद्रीय संघटनेला १५० पौंडांची देणगी दिली. पॅरिसमध्ये असताना महाराजांना कोल्हापूरला होणाऱ्या १५ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान देणारी तार मिळाली. सयाजीरावांनी हे आग्रहाचे आमंत्रण आनंदाने स्वीकारले. महाराज १८ महिने १३ दिवसांचा हा युरोप प्रवास संपवून ५ डिसेंबर १९३२ ला मुंबईत आले.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६५