पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होम यांना श्री. पी. डब्ल्यू. सार्जंट यांनी महाराजांबरोबर बडोदे येथे जाणे निश्चित करणे. श्री. होम व सार्जंट यांना महाराजांच्या चरित्रासाठी लागणारे साहित्य, चित्र वगैरे बाबी जमवणे आणि लिखाण करण्याचे काम सोपवणे. पॅरिस येथे घेतलेल्या घराचे सजावट व इतर कामांबद्दल निर्णय घेऊन त्याप्रमाणे सूचना देणे, लंडन येथे सोलोमन यांच्याकडून स्वतःची दोन व्यक्तिचित्रे तयार करवून घेणे, महाराजांच्या पुतळ्यांसाठी मापे देणे, दिल्लीतील बंगल्याच्या कामाचे नकाशे, रेखाचित्रे व संकल्प चित्रे बघून निर्णय घेणे, त्या निर्णयाअगोदर वास्तूतज्ज्ञांबरोबर बैठका घेवून चर्चा करणे अशी सर्व कामे एकाचवेळी रस्सेल मुक्कामात चालू होती. या कामांच्या यादीवरून सयाजीरावांच्या कामाची व्याप्ती आणि पद्धत लक्षात येते.

 इंग्लंडमधील कवी मंडळ दरवर्षी आपला वार्षिक उत्सव साजरा करत असे. या मंडळाने १९२५ चा उत्सव अल्दवर्थ येथील महाराजांच्या बंगल्यात साजरा करण्यास सुचविण्यात आले. त्यानुसार ११ जुलैला हा उत्सव महाराजांच्या बंगल्यात साजरा झाला. यावेळी महाराजांतर्फे कवी मंडळास उपहार देण्यात आला होता. इंग्लंडमधील रस्सेल आणि अल्दवर्थ येथील निवासस्थानांवर होणारा अनाठायी खर्च लक्षात घेवून सयाजीरावांनी हे बंगले विकण्याचा निर्णय घेतला. देसाईंनी

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५६