पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तोंड देत हे काम न थांबवता सुरू ठेवले पाहिजे. व्हनाक्युलरच्या संचालकांना यासाठी १०० रु. दरमहा देण्याच्या आज्ञा महाराजांनी दिल्या आहेत. ही रक्कम पेंशनच्या रकमेव्यतिरिक्त असेल.'
 वरील आदेशाप्रमाणेच शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात पाठविण्यासंदर्भातील योजना तयार करण्याचा महत्वपूर्ण आदेश महाराजांनी दिला. यावरून प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण याबाबतचे महाराजांचे धोरण १८९४ मध्येच निश्चित झाले असल्याचे दिसते. भारतातील परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजनेचा हा आरंभ होता. तो आदेश पुढीलप्रमाणे 'राज्याच्या वित्त विभागाची परवानगी असेल, तर प्रवासी शिष्यवृत्तीची एक योजना सुरू करावी. ज्याद्वारे बडोदा संस्थानच्या नागरिक असलेल्या तरुण विद्यार्थ्यांना युरोपमध्ये अभ्यासासाठी प्रवास सवलत द्यावी. बडोदा कॉलेजचे हे विद्यार्थी आपणास त्यासाठी शपथपत्र देतील की, त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर ते संस्थानमध्येच नोकरी करतील. या योजनेचा तपशील तयार करावा, खर्चाचा विचार करावा व विद्यार्थी स्वीत्झर्लंडमध्ये शिक्षण घेतील असे पाहावे. '

 प्राथमिक शिक्षण, परदेश शिक्षण याबरोबरच लहान मुलांच्या मनोरंजनासाठीची पुस्तके हा विषयसुद्धा महाराजांच्या नजरेतून सुटला नव्हता. लहान मुलांच्या शारीरिक विकासाचा विचार करून महाराजांनी याविषयीचा पुढील आदेश काढला. 'मुलांसाठी खेळांची माहिती एका पुस्तकात संकलित करावी. '

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ३७