पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरकारचे राजकीय अधिकारी कर्नल यांना पत्र लिहून व्यक्त केला. शेवटी त्यांनी ७ मे १८९२ रोजी विदेश सचिव मॉर्टीमर डूड यांना निर्वाणीचे पत्र लिहिले आणि ते युरोपला निघून गेले.

 या तिसऱ्या प्रवासात महाराजांनी रियासतकार सरदेसाईंना मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी युरोपला बोलावले होते. परंतु सरदेसाईंना महाराजांनी एक अट घातली होती. ती अशी की त्यांच्या परदेश प्रवासानंतरच्या प्रायश्चित्ताचा खर्च त्यांनी स्वतः करावा. या प्रवासात पॅरीस येथे डॉ. चारकॉट यांना प्रकृती दाखवली. तेथून महाराज लंडनला गेले. तेथे प्रिन्स ऑफ वेल्स यांनी महाराजांचे स्वागत केले. लंडनमध्ये महाराजांनी हाऊस ऑफ पार्लमेंटलाही भेट दिली. तेथे अनेक महत्वाच्या लोकांशी महाराजांच्या भेटी झाल्या. या दरम्यान महाराजांनी समर्थ यांना झुरिच येथील तंत्रनिकेतन पाहण्यासाठी पाठवले आणि तेथील तंत्रविषयक कामाची संपूर्ण माहिती घेतली. या माहितीचा उपयोग महाराजांनी १८९० मध्ये स्थापन केलेल्या कलाभवनच्या प्रगतीसाठी करून घेतला असावा. याच प्रवासात इंग्लंडच्या महाराणींनी महाराजांच्या पत्नी चिमणाबाई दुसऱ्या यांना 'इम्पेरिअल ऑर्डर ऑफ क्राऊन ऑफ इंडिया' हा सन्मान बहाल केला. याच प्रवासात किल्लेदार नावाच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाची तरतूद महाराजांनी केली. ऑक्टोबर १८९२ मध्ये डॉ. चारकॉट यांच्याकडून महाराजांची तब्येत तपासण्यात आली. महाराजांना तीन महिने अधिकचा काळ युरोपमध्ये थांबण्याचा

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / २९