पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांनी या कामासाठी पुढाकार घेण्याच्या चिटणीसांनी केलेल्या आग्रहानुसार शिंदे सरकारांनी ते काम स्वीकारले. काही दिवसात प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानच्या भेटीला येणार होते. त्यामुळे राजपुत्रांच्या हस्ते स्मारकाचा कोनशिला समारंभ करण्याचे ठरविले. स्मारकासंदर्भात सभासदांचे एक शिष्टमंडळ मुंबईत गव्हर्नरांना भेटले. गव्हर्नरांना शिवाजी स्मारकाची कल्पना पसंत पडली; पण त्यांनी छत्रपतींचे हे स्मारक अखिल भारतीय असावे अशी अट घातली. केवळ मराठा जातींचे ते स्मारक असेल तर राजपुत्र येणार नाहीत, त्यामुळे गव्हर्नरांची ही अट शिष्टमंडळास मान्य करावी लागली.

 राजर्षी शाहू आणि माधवराव शिंदे यांच्या पुढाकाराने पुण्यात छत्रपती शिवाजी स्मारकाचा कोनशिला कार्यक्रम पार पडला. काही दिवसांनी माधवराव शिंदे यांनी मुंबईत आपल्या बंगल्यावर सर्व समाजातील निवडक मंडळींची बैठक बोलावली. या बैठकीत शिवरायांच्या सर्वपक्षीय स्मारकाची योजना मांडली. त्याचबरोबर या स्मारकासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्यात मराठे, ब्राम्हण, पारशी, गुजराथी सर्व जातींची प्रमुख मंडळी घेण्यात आली. या बैठकीत सर्वपक्षीय स्मारकाच्या योजनेला कोणीही उघड विरोध केला नाही; पण बैठक संपताच जमलेल्या काही मंडळीत या विरोधात चर्चा सुरू झाली. पुण्यातील मराठ्यांनी छत्रपती शिवाजी स्मारकाच्या इमारतीचे काम सुरू करण्यास विरोध केला. एवढेच नव्हे तर इतर

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २७