पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अट घातली होती. देवासचे खासेराव पवार यांना परदेशात शिक्षणासाठी आणि प्रवास खर्चासाठी खासेरावांनी बडोद्यातून मदत मिळवून दिली.
 "मराठा शिक्षण परिषदेच्या स्थापनेपासून तो तहत तिला मूर्तस्वरूप येईपर्यंत तिच्या सर्वांगीण उन्नतीप्रीत्यर्थ तन- मन-धन- खर्च करणारे समाजभूषण श्रीमंत रा. ब. खासेराव जाधव यांच्या पुण्यस्मृतीस परिषदेच्या इतिहासाचा 'पूर्वार्ध' अत्यंत नम्रतेने अर्पण करीत आहे." मराठा शिक्षण परिषदेच्या स्थापनेत खासेरावांचे काय योगदान आहे याची साक्ष जयवंत जगताप यांनी संपादित केलेल्या परिषदेच्या या अहवालाच्या अर्पणपत्रिकेतून मिळते. खासेरावांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये अपार कष्ट उपसले. खासेरावांच्या या कर्तबगारीला महाराजांच्या निर्विवाद पाठबळाचे अधिष्ठान होते.

 बडोद्यात त्या काळात एकही मराठी वर्तमानपत्र प्रकाशित होत नव्हते. खासेरावांचे मित्र आणि मराठा शिक्षण परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते भगवंतराव पाळेकर यांनी खासेरावांजवळ बडोद्यातील मराठी वाचकांसाठी वर्तमानपत्र सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. खासेरावांनी पाळेकरांच्या 'जागृती' या मराठी वृत्तपत्राला केवळ प्रोत्साहन दिले नाही तर सर्व प्रकारची आर्थिक मदतही केली.

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २२