पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांची निवड करण्यात आली. खासेराव जाधव, अरविंद घोष, बॅ. केशवराव देशपांडे यांच्यासारख्या जहाल मित्रांचे पाठीराखे असले तरी, त्यांनी राष्ट्रीय कार्य आणि मराठ्यांच्या शिक्षणाचे कार्य परस्परविरोधी कधीच मानले नाही. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि वजनामुळेच मराठा शिक्षण परिषदेला महाराज आणि बाहेरील नवनवे राजपुरुष, समाजातील कर्ते मंडळींचा पाठिबा मिळत गेला.”

 पहिल्या परिषदेचे अध्यक्षपद सयाजीरावांना देण्याचा परिषदेचा निर्णय म्हणजे परिषदेचा मुख्य आधार सयाजीराव होते याला मिळालेला दुजोरा होय. त्याला कारणही तसेच होते. सयाजीरावांनी समाजातील प्रत्येक दुबळ्या घटकाला बळ दिले होते. हे बळ देत असताना आपला देश बलशाली व्हावा हीच त्यांची धारणा होती. त्यामुळेच १८८२ मध्ये त्यांनी आपल्या संस्थानातील सर्वात दुबळी प्रजा असणाऱ्या आदिवासी आणि अस्पृश्यांसाठी शिक्षण आणि वसतिगृहाची मोफत सुविधा निर्माण करून समाज तळातून पुन्हा बांधायला सुरुवात केली होती. मराठ्यांच्या शिक्षणाला त्यांनी दिलेले भक्कम पाठबळ हा याच प्रक्रियेचा भाग होता. मराठा शिक्षण परिषदेला सयाजीरावांनी दिलेले आर्थिक पाठबळ यादृष्टीने महत्त्वाचे होते. यासंदर्भात डॉ. शोभा इंगवले म्हणतात, “ श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांनी प्रोत्साहन व प्रेरणा दिल्यामुळे अखिल भारतीय मराठा परिषद स्थापनेस अनुकूल वातावरण निर्माण झाले.”

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १९