पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अल्पपरिचय

 कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा जन्म २० ऑगस्ट १८६० रोजी वेंगुर्ले तालुक्यातील केळूस या गावी कुणबी-मराठा जाती झाला. केळुसकरांचे वडील तरुणपणी कोकणातील दशावतारी नाटक मंडळीत काम करत. त्यावेळी वाडीच्या खेमसावंतांशी वैर असणाऱ्या फोंड सावंतांनी केळुसकरांचे वडील आणि त्यांच्या मित्रांना करमणुकीसाठी पळवून नेले. या बंडखोरांच्या तावडीतून सुटल्यानंतर ते सावंतवाडीच्या राजवाड्यावर नोकरीस राहिले. तेथून सरकारी कामानिमित्त बेळगावला गेले असता तेथे पोलिसात भरती झाले. या नोकरीदरम्यान एका मामलेदारास मोठ्या आजारातून बरे केल्यामुळे त्याने केळुसकरांच्या वडिलांना ‘ते मुंबईला आल्यास चांगली नोकरी मिळवून देण्याचे' वचन दिले. त्यानुसार ते मुंबईला गेले. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून सुमारे ४ वर्षे कृष्णरावांचे वडिलांच्या नोकरीनिमित्ताने मुंबईत वास्तव्य होते. वडिलांनी मुंबईतील नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर केळुसकर कुटुंबीय केळूस या मूळ गावी आले.

 केळूसला आल्यानंतर कृष्णरावांना सावंतवाडीच्या शाळेत घालण्यात आले. तेव्हा त्यांना एका नातेवाईकाकडे ठेवण्यात आले होते. नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या शेणवी कुटुंबाच्या घरी कृष्णराव सतत जात असत. त्यावेळचा एक प्रसंग केळुसकरांनी आपल्या आत्मचरित्रात वर्णिला आहे. केळुसकर लिहितात, “त्यांच्या घरी पोथ्या वाचण्याचा प्रघात असे. या

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ८