पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दामोदर सावळाराम यंदे यांनी केळुसकरांच्या 'श्रीमद्भगवगीता सान्वय पदबोध, सार्थ आणि सटीक' ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.
भानू गांगनाईकांकडून फसवणूक
 सयाजीराव महाराजांनी महाराष्ट्र ग्रंथमालेत प्रकाशित झालेल्या 'घर आणि त्याच्या सभोवतालची जागा' या ग्रंथाचा मराठी 'अनुवाद' करण्याची जबाबदारी भानू गांगनाईक यांच्यावर सोपवली. गांगनाईक हे केळुसकरांचे मित्र होते. केळुसकरांनी गांगनाईक यांना अनेक पुस्तकांच्या अनुवादासाठी सहकार्य केले होते. त्याचप्रमाणे केळुसकरांनी त्यांना 'घर आणि त्या सभोवतालची जागा' या ग्रंथाचा मराठी अनुवाद करून दिला.
 सयाजीराव महाराजांनी खरेदी केलेली एक आगबोट दिवाण आंग्रेनी अलिबागच्या किनाऱ्याला आणली असता खडकाला धडकून फुटली. या संदर्भात रावबहाद्दूर जे. पी. तालचेरकर यांनी इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहिला. तालचेरकरांच्या या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद करण्याची आज्ञा सयाजीराव महाराजांनी गांगनाईक यांना केली. यावेळी गांगनाईक यांनी केळुसकरांना पत्र पाठवून या लेखाचा मराठी अनुवाद करून पाठवण्यास सांगितले. त्यांच्या या पत्रानुसार केळुसकरांनी तो लेख वाचला. परंतु केळुसकरांना तो लेख समर्पक न वाटल्यामुळे त्यांनी 'आमचे नौकायान' या विषयावर संशोधनात्मक स्वतंत्र लेख लिहून गांगनाईक यांना पाठविला.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३७