पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 याचबरोबर केळुसकर 'धर्माजी रोकडे मोफत वाचनालय', 'नाईक मराठा मंडळ', 'नीतिप्रसारक मंडळ', 'सोशल सर्व्हिस लीग', 'आर्यन एक्सलशियर लीग', 'पिसाळ शेतकरी शाळा', 'सेवासदन सोसायटी' व 'अहिल्याबाई मोफत सूतिकागृह' या विविध संस्थांचे संस्थापक, मार्गदर्शक व सक्रिय कार्यकर्ते होते. यापैकी अनेक संस्थांचे नियम आणि ध्येयधोरणे केळुसकरांनी निश्चित केली होती.
संशोधक-लेखक केळुसकर
 साधे हायस्कूल शिक्षक असणारे केळुसकर आयुष्यभर ज्ञानमार्गी राहिले. त्यांनी जे लेखन केले त्याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. परंतु लेखनाअगोदर त्यांनी स्वयंप्रेरणेने जोपासलेला चौफेर वाचन व्यासंग थक्क करणारा होता. व्यावहारिक जबाबदाऱ्या वगळता त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी व्यासंगात घालवला. त्यामुळेच कीरांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चरित्रकाराने 'महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मय महर्षी' अशा समर्पक शब्दात त्यांचे मूल्यमापन आहे. जात आणि धर्म ही चौकट खऱ्या अर्थाने ज्ञानमार्गी झाल्याशिवाय मोडता येत नाही. आज आपण जेव्हा त्यांच्या समग्र लेखनाचा विचार करतो तेव्हा त्यांच्यातील प्रखर वैज्ञानिक दृष्टी असणारा लेखक आपण अनुभवतो. हीच त्यांच्या संशोधन आणि लेखनाची खरी ताकद आहे.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १६