पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३ वर्षे भाषणे केल्यामुळे आकस्मिकपणे कोणत्याही विषयावर बोलण्याची आपली तयारी झाल्याचे केळुसकरांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. 'दीनबंधू' प्रमाणेच 'सुबोधपत्रिका', 'सुबोधप्रकाश', 'शेतकऱ्यांचा कैवारी' इत्यादी साप्ताहिकांत केळुसकरांचे विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध होत होते. त्यापैकी एक लेख 'राजकीय ऋषी' मामा परमानंद यांनी वाचला. तो लेख वामन मोडकांनी लिहिल्याचा समज झाल्यामुळे मामा परमानंदांनी केळुसकरांऐवजी मोडकांचे अभिनंदन केले..
 १८८७ मध्ये मुंबईच्या हेमंत व्याख्यानमालेत रावबहाद्दूर वामन आबाजी मोडक यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानावर केळुसकरांनी 'इंदूप्रकाश'मध्ये लेख लिहून मुद्देसूद व सडेतोड टीका केली. केळुसकरांचा हा लेख प्रसिध्द झाल्यानंतर दोन दिवसांनी विनायक कोंडदेव ओक, पेठे, इंदूप्रकाशचे शंकर पांडुरंग पंडित इ. मित्रमंडळी बोलत बसली असता केळुसकर तेथे गेले. तेव्हा केळुसकरांच्या इंदूप्रकाशमधील लेखाची प्रशंसा करताना शंकर पंडित म्हणाले, “मराठा असून कसे चांगले लिहितो.” पंडितांनी केळुसकरांची केलेली ही प्रशंसा विनायक ओक यांना आवडली नसावी. विनायक ओक तोऱ्यात उत्तरले, “जरी हा मराठा असला तरी ब्राह्मणांशिवाय इतरांना शुद्ध मराठी लिहिता येणार नाही. धार्मिक विषय तर त्यांना समजणेच शक्य नाही.”.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १२