पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिहितात,"दुसऱ्या दिवशी वडील कामावर न जाता माझ्या शाळेत आले आणि केशवरावांकडे गयावया करू लागले. तरी तो कठोर गृहस्थ बिलकूल नरम न होता म्हणू लागला की, तुम्हा कुणबटांना कोणी सांगितले आहे इंग्रजी शिकायला ? फी देण्याचे सामर्थ्य नसेल, तर याला कसलातरी धंदा शिकावयास ठेवा." पहिल्या अनुभवाप्रमाणेच शालेय जीवनातील हा दुसरा अनुभव मनोधैर्य खच्ची करणारा होता. परंतु केळुसकरांनी ज्या चिकाटीने पुढील जीवनात संघर्ष केला तो पाहता जातीय दुय्यमत्वाचा हा अनुभव त्यांना जातीद्वेषाकडे घेऊन गेला नाही तर जातिभेद निर्मूलनाच्या रचनात्मक कामाकडे घेऊन गेला असेच म्हणावे लागेल.

 १८८१ साली मुंबईच्या विल्सन हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी इस्त्रायली शाळेमध्ये चार वर्षे शिक्षकाची नोकरी केली. १८८६ पासून केळुसकरांनी विल्सन हायस्कूलमध्ये अध्यापक म्हणून इमानदारीने नोकरी केली. गरीब, निराश्रित आणि होतकरू विद्यार्थ्यांना फी सवलत मिळविण्यासाठी केळुसकर सतत प्रयत्नशील होते. गरीब विद्यार्थ्यांच्या आर्थिक व इतर शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी श्रीमंत लोकांना भेटून विनंती करत राहणे हा केळुसकरांचा जणू दिनक्रमच झाला होता. त्यांच्या या प्रयत्नांचा लाभ झालेल्या असंख्य विद्यार्थ्यांमध्ये डॉ. आंबेडकर हे एक होते. केळुसकरांनी इंग्लंड, जर्मनी व अमेरिका या देशांतील शिक्षण पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला होता.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १०