पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 म्हणजे १९०२ पासून भास्करराव जाधव आणि दीनबंधू यांच्यामार्फत महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव, १९०६ मध्ये अस्पृश्योद्धाराबाबतचे सयाजीरावांचे भाषण वाचनात येणे, १९०८ मध्ये कोल्हापुरात विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्य उद्धाराबाबतचे भाषण ऐकणे आणि शाहूनगरीतील जडणघडण हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा पिंड घडवणारा 'विचारमेळा' आहे. फुल्यांपासून ते विठ्ठल रामजी शिंदे आणि शाहू यांचा बडोद्याशी असणारा वैचारिक संवाद विचारात घेता महाराष्ट्राची पुरोगामी विचार परंपरा घडवणाऱ्या 'रयत चळवळीला ' आत्मबळ देण्यात सयाजीरावांचे असणारे योगदान स्पष्ट होते. पुरोगामी चळवळीचा इतिहास तुटकपणे अभ्यासल्यामुळे हे पचणे आपणास जड जाते. परंतु 'जोडलेला इतिहास' (Connected History ) या संजय सुब्रमण्यमच्या प्रगत संकल्पनेचा आधार घेत जेव्हा आपण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची पाळेमुळे खणू लागतो तेव्हा सयाजीराव या 'गंगोत्री' पर्यंत जाऊन पोहोचतो.

 वरील विवेचनावरून शूद्रातिशूद्रांच्या गुलामगिरीचा अंत करण्यासाठी फुल्यांनी ज्ञानाचे जे शस्त्र शोधून काढले होते त्याचा 'महाप्रयोग' सयाजीरावांनी बडोद्यात केला. या प्रयोगाची ऊर्जा इतकी जबरदस्त होती की तिने महाराष्ट्राचा आसमंत कायमचा 'प्रकाशमान केला. अर्थात कर्मवीरांची आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था हे तिचे सर्वात दैदीप्यमान यश होते. या संदर्भात कर्मवीरांचे समकालीन आणि राजर्षी शाहूंच्या तालमीत

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / २९