पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लग्न करण्यासाठी आईला आजोबांचे मित्र सर मिर्झा अली बेग यांच्याकडे लंडनला पाठवण्यात आलं. त्यांच्या किशोरवयीन मुलांवर या घटनेचा काय परिणाम झाला त्याचं वर्णन रशीद अली बेग या एका मुलाने लिहून ठेवलं आहे.
 'या घटनेने जी खळबळ माजली ती मला चांगली आठवते. इंग्लंडमध्ये भारतीय लोक फार थोडे होते. त्यामुळे साडी या प्रकाराने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. इंदिरादेवींच्या सौंदर्याने लोकांना खिळवूनच ठेवलं. त्यांच्या सौंदर्याचं वर्णन 'अद्भुत' या शब्दाने करणं म्हणजे वापरून गुळगुळीत झालेला शब्दच पुन्हा वापरणं. आमच्या घरी वार्ताहरांनी गर्दी केली. त्यांची असंख्य छायाचित्र घेतली गेली. आम्ही लहान मुलं त्या परावर्तित झगमगाटात, त्या वैभवात आनंदाने वावरलो. ते लग्न ही त्या मोसमातली मोठी बातमी होती. वृत्तपत्रांनी छायाचित्रांसह पूर्ण पान या घटनेला दिलं होतं. सगळ्या वृत्तपत्रांच्या कात्रणांची आम्ही फाइल केली. बराच काळ आम्ही त्या फायली पुन:पुन्हा बघून स्मरणरंजन केलं.

 अखेर १९१३ च्या जुलै महिन्यात माझे आई-वडील लंडनमध्ये विवाहबद्ध झाले. माझ्या आजीची इंग्लिश सहचरी मिस टॉटेनहॅम आणि एक वकील अशा दोघांनी पालकांची भूमिका पार पाडली. आजीने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छेची तार पाठवली. उभयतांचं आयुष्य सुखी व्हावं अशी इच्छा व्यक्त

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४५