पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हा मोह सोडावा म्हणून आईवर सर्व तऱ्हेचे दबाव आणले गेले. तिने राजपुत्राला भेटण्यावर, त्याच्याशी संपर्क ठेवण्यावर बंदी आणली गेली. तिच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल अशा खुबीने दासींची, पाठराखणींची संख्या नेहमीपेक्षा वाढवण्या आली. पण शेवटी तिच्यातही माझ्या आजीचा स्वतंत्र बाणा आणि कणखर वृत्ती उतरली होतीच, शिवाय ती प्रेमात पडली होती. सगळे पहारे चुकवून तिचा राजपुत्राशी दोन वर्ष व्यवस्थित पत्रव्यवहार चालू होता. एवढंच नाही तर उन्हाळ्यात आजी- आजोबांबरोबर लंडनला गेलं की तिथे तिच्या आणि त्याच्या चोरून भेटी व्हायच्या. कारण तो तिच्या मागोमाग आलेलाच असायचा. १९६८ साली, आईच्या मृत्यूनंतर मी तिची काही कागदपत्रं चाळत होते. त्यात मला त्यावेळची पत्रं सापडली. वडिलांची पत्रं निरनिराळ्या टोपणनावांनी आलेली होती. मिसेस मिली ब्रूक किंवा सिल्विया वर्कमन वगैरे. पत्रांमध्ये कूचबिहारच्या मोह पाडणाऱ्या जीवनाचं वर्णन असायचं किंवा कलकत्त्यातले हिवाळ्यातले उत्सव, दार्जिलिंगमधला वसंत ऋतू, बॉल नृत्य, फॅन्सी ड्रेसपार्टी, पोलो स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, नृत्य, शिकार इत्यादींची वर्णनं.
 तथापि कोंडी फुटण्याची काही चिन्हं दिसत नव्हती. कूचबिहारच्या राजपुत्राशीच लग्न करण्याचा आईचा निश्चय ठाम होता; तर आजी-आजोबा त्यांचा विरोध सोडायला तयार नव्हते. अखेर, १९१३ च्या उन्हाळ्यात आजी-आजोबा इंग्लंडला

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४३