पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

द्विभार्या प्रतिबंधक कायदा करविला आहे. माझ्या या विवाहाने हा कायदाही मोडला जाणार आहे. या सगळ्या कारणांचा विचार करून मी शांतपणे निर्णय घेतला की, या विवाहास माझी तयारी नाही. हे पत्र मी पूर्ण विचारांती लिहीत आहे. आपणास झालेल्या त्रासाबद्दल क्षमा करावी.”

 १९०८ पासून सयाजीरावांची नात इंदुमतीदेवी आणि शाहू महाराजांचे सुपुत्र राजाराम यांच्या विवाहासंदर्भातील पत्रव्यवहार सयाजीराव आणि शाहू यांच्यामध्ये सुरू झाला. २९ मार्च १९११ ला शाहूंना लिहिलेल्या पत्रात 'इंदुमतीदेवींचे वय बडोद्याच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १२ वर्षे नसल्यामुळे त्या १२ वर्षाच्या होईपर्यंत विवाह करता येणार नाही' अशी भूमिका सयाजीराव घेतात. यानंतर १ वर्षाने इंदिराराजे माधवराव शिंदेंना 'तुमचा हा दुसरा विवाह असल्यामुळे तुमच्याशी विवाह केल्यास तो बडोदा संस्थानच्या द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा भंग होईल' अशी भूमिका घेतात. या दोन्ही पत्रांचा विचार करता मुलगी वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून जात होती असेच म्हणावे लागेल. तर सयाजीरावांच्या उक्ती आणि कृतीतील एकवाक्यतेच्या पार्श्वभूमीवर बडोद्याच्या द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा भंग करणारा निर्णय सयाजीरावांनी नेमका का घेतला यावर अधिक संदर्भ शोधून संशोधन करावे लागेल.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४०