Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कालिदासाच्या या नाटकाचा विषय प्रेमविवाहाचा होता आणि त्यावेळी इंदिराराजेंची मनः न:स्थिती तशीच असल्यामुळे त्यात त्यांचे मन विशेष रमले होते. वाचनाच्या ओघात त्या सरदेसाईंना आपल्या मनाची करुण स्थिती सांगत असत. ते ऐकून सरदेसाईंनाही वाईट वाटे. प्रेमाशिवाय पाशवी विवाह काय कामाचा यावरच अधिक चर्चा होत असे.
 या चर्चेनंतर सरदेसाई इंदिराराजेंना विचारत असत, “तुम्ही माझ्याशी जसे मनमोकळेपणीं बोलता तसे ते सर्व तुम्ही आपण होऊन आईबापांशी का नाही बोलत? तेच तुमचे मुख्य कळकळीचे हितकर्ते. ते काही तरी तोड काढतील. मी कसा झालो तरी त्यांचा आज्ञाधारक सेवक." आपल्या आई-वडिलांजवळ आपले मन मोकळे करण्याचे सरदेसाईंनी सुचविले, पण त्यावर इंदिराराजे म्हणत, “आईबापांना माझे बोलणे ऐकून घेण्याइतकी स्वस्थता आहे कुठे? जरा तोंड उघडले की मजवर खेकसून गप्प बसवितात. सर्व बोलणेच खुंटते. माझा अगदी सर्व तऱ्हेने नाइलाज झालेला आहे. माझा जीव अगदी नकोसा झाला आहे."
 इंदिराराजेंच्या विवाहासंदर्भातील चर्चा चालू असताना सयाजीरावांनी त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. याच दरम्यान सयाजीरावांनी इंदिराराजेंना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने त्यांचा बडोदा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाराजांच्या या कृतीवर कर्मठ समाजाबरोबरच जवळच्या नातेवाईकांनीदेखील टीका केली. या संदर्भात ४ जानेवारी १९१० रोजी बडोद्यातून

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३४