पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाबासाहेबांचा अभिप्राय यांचे एकत्र वाचन केल्यास कोल्हापूर या प्रागतिक संस्थानाच्या सामाजिक धोरणांवरील बडोद्याचा प्रभाव स्पष्ट होतो. इतकेच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या लोकशाही राज्यघटनेतील अनेक कलमेही बडोद्यातील कायद्यांशी सुसंगत आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारतातील सामाजिक लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणूनसुद्धा सयाजीरावांचा विचार करणे अपरिहार्य ठरते.
 संस्थानात प्रसूतीवेळी होणारे मातांचे मृत्यू रोखणे, बाळाच्या जन्मावेळी दाई हजर असण्याचे महत्त्व लोकांना पटवून देणे आणि दाईप्रती असणारा निष्काळजीपणा व केले जाणारे दुर्लक्ष यावर मात करण्यासाठी सयाजीरावांनी १६ ऑक्टोबर १९१९ रोजी बडोद्यात 'दाई कायदा' लागू केला. या कायद्यानुसार परिचारिका प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही महिलेला सुईणीचे काम करण्यास बंदी घालण्यात आली. परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करून एखाद्या रुग्णालयात कामाचा अनुभव घेतल्यानंतरच त्या स्त्रीला परिचारिकेचा परवाना दिला जात होता.
 १९३१ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात हिंदू घटस्फोट कायदा लागू केला. कोर्टात नोंदणी केल्याशिवाय घटस्फोट मान्य केला जाणार नाही अशी तरतूद सयाजीरावांनी या कायद्यात केली. या कायद्यानुसार कोणत्याही स्त्रीच्या पतीचा मृत्यू होऊन ७ वर्षे झाली असतील, त्याने संन्यास घेतला असेल, धर्मांतर केले असेल किंवा तो नपुंसक असेल तर त्या स्त्रीला अशा लग्नातून' घटस्फोट

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २२