पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षणातून समाजक्रांती

 महाराजा सयाजीरावांची कारकीर्द उत्तम प्रशासन, शिक्षण, धार्मिक, सामाजिक, औद्योगिक सुधारणांच्यादृष्टीने क्रांतिकारक ठरली. त्यांच्या दरबारामध्ये अनेक तज्ज्ञ नवरत्ने होती. त्यांचे ज्ञान आणि हुशारीचा वेळपरत्वे अचूक उपयोग करत सयाजीरावांनी ६४ वर्षे 'उत्तम' राज्यकारभार केला. आपली प्रजा साक्षर आणि त्याही पुढे जाऊन ज्ञानी व्हावी या उद्देशाने सयाजीरावांनी १९०६ मध्ये बडोद्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. याचे पुढे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम समाजावर झाल्याचे आपल्याला पहायला मिळतात.

 आपल्या प्रजेत बहुसंख्य असणाऱ्या मराठा जातीच्या एकूण शैक्षणिक स्थितीविषयी बोलताना सयाजीराव म्हणतात, “मराठा समाज शिकत नाही. आपापसातील दुही हेच या समाजाच्या अध:पतनाचे मुख्य कारण आहे. या समाजाने शिकले पाहिजे. शिक्षणाशिवाय त्यांच्यात परिवर्तन होऊ शकणार नाही.” म्हणूनच सयाजीराव महाराजांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजात शिक्षण प्रसार करू इच्छिणाऱ्या अनेक व्यक्तींना शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी सढळ हाताने मदत केली. तसेच मराठा व इतर बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या.

 महात्मा फुले यांची बहुजनांच्या शिक्षण प्रसाराची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवत जनतेच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ९