पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें खंड १२ वा.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकाशकाचे दोन शब्द


 सदरहु खंडांत चिंतो विठ्ठल रायरीकर यांच्या दप्तरांतील कागदपत्रांचा संग्रह केला आहे.

 श्री. रघुनाथ बाजीराव व बाजीराव रघुनाथ यांचीं या खंडांत छापिलेली अस्सल पत्र इतिहासाच्या वाचकांस विशेष चिंतनीय वाटतील. श्री. रघुनाथ बाजीराव यांची मानसिक व सांपत्तिक स्थित्यंतरें कसकशीं होत गेलीं याचा उलगडा हीं पत्रें करतील. या वेळच्या स्थितीचें मि. फॉरेस्ट वगैरेनी काढलेलें चित्र या पत्रांशी ताडून पाहणें विशेष फायदेशीर होईल हे सांगणे नको. भाऊबंदकीच्या काळांतील अद्याप पुष्कळसा पत्रव्यवहार प्रसिद्ध व्हावयाचा आहे; व तो प्रसिद्ध झाल्यावर त्याचा विचार एका विस्तृत निबंधांत करण्याचा रा० राजवाडे यांचा मानस आहे.

 या खंडांतील पृष्ठें १-१३६ एवढा मजकूर दैनिक ज्ञानप्रकाशांत दोन बर्षांपूर्वी क्रमशः प्रसिद्ध झाला होता; त्या पुढील मजकुर या मंडळाचे एक उत्साही सभासद श्री. गंगाधर नारायण ऊर्फ आबासाहेब मुजुमदार यांच्या मदतीनें आतां प्रसिद्ध होत आहे. या मदतीबद्दल ज्ञानप्रकाशकर्ते व श्री. मुजूमदार यांचे मंडळ आभारी आहे.

 फाल्गुन व. ५ शके १८३४

 आप्पा बळवंत वाडा

चिटणीस

 शनवार पेठ पुणे शहर

भा.इ.सं.मंडळ