पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१२ )

( ता० ३ जून इ० सन १७५२) मानाजीरावानें त्याचा वध करून त्याचें डोकें महंमदअल्लीकडे नजर पाठविले. व अशा दुःखद रीतीनें चंदासाहेबाचा अंत होऊन कर्नाटकच्या राजकीय रंगभूमीवरील एक अत्यंत महत्त्वाचा अंक समाप्त झाला.

 चंदासाहेबाबरोबर चाललेल्या युद्धांत, महंमदअल्ली हा विजयी झाल्या- नंतर या युद्धांमध्ये प्रतापसिंहानें आपणांस साह्य केले म्हणून बक्षिसादाखल त्याने तंजावरची दहा वर्षांची खंडणो माफ केली आणि कोइलाडी व यलंगाडू हे दोन तालुके त्यानें प्रतापसिंहास जहागीर दिले. त्रिचनापल्ली येथील युद्धां- मध्ये म्हैसूरकर नंदराज दलवाई, गुत्तीकर मुरारराव घोरपडे व इंग्रज यांनीं महंमदअल्लीस उत्तम मदत करून समरांगणावर चांगली कामगिरी बजाविली होती, त्यामुळे त्यांपैकी दलवाई व घोरपडे यांनी एकत्र होऊन त्रिचनापल्ली व श्रीरंगम् आपल्या ताब्यात द्यावें, म्हणून महंमदअल्लीकडे मागणी केली. परंतु महंमदअल्ली याने त्यांच्या मागणीची टाळाटाळ केल्यामुळे, ते उभयतांही त्रिचनापल्लीच्या पश्चिमेस तळ देऊन तेथे राहिले. व गुप्तरांतीने फ्रेंचार्शी कार- स्थाने करून महमदअल्ली व त्याचे साह्यकारी तंजावरकर यांच्याशी युद्ध कार- ण्याचा व त्रिचनापल्ली हस्तगत करून घेण्याचा त्यांनी मनसुवा केला. तथापि तंजावरकर प्रतापसिंह वळल्यास त्याला फोडून एकट्या महंमदअल्लीसच पहि- ल्यानें झोडावा, अशा इच्छेने त्यांनी प्रयत्न आरंभिला. प्रतापसिंहास अनुकूल करून घेण्यासाठी धाकदपटशा व लांचलुचपत हे दोन्हीही प्रयोग त्याच्यावर केले. "तुझा सेनापति मानाजीराव याने आमचा दोस्त चंदासाहेब याचा वध केला आहे, त्याचा सूड उगविन्याशिवाय आम्ही राहणार नाहीं, व तुम्हीं आमच्या शत्रूस ( महंमदअल्लोस) यापुढे जर मदत केलीत, तर तुमचा मुलूख उध्वस्त केल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीं." असा निर्वाणांचा निरोप त्यास पाठविला. त्यामुळे प्रतापसिंह अगदी घाबरून गेला. शिवाय प्रतापसिंहाचा दिवाण सखोजी नाईक व सेनापति मानाजीराव यांचे वांकडें होतें. या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी सखोजीस अंतस्थ रीतीनें लांच देऊन आपल्या बाजूस अनुकूल करून घेतलें, व त्याच्या मार्फत प्रतापसिंहाचें मन वळवून मानाजी. रावास सरखेळ पदावरून दूर करविलें. थोडक्यांत म्हणजे तंजावरचा दिवाण