पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११६)

बाळापूर, व शिर्के हे पांच प्रांत जहागीर दिले. व पुढे रतनपूर, देवगड, कनकगिरी, व राजदुर्ग हे चार परगणे अदिलशहानें शहाजीस दिल्यानें तेंही लाच जहागीरीत पुढे सामील झाले. शिवाय अदिलशहानें त्यास इंदापूर, बारामती, व मावळ प्रांत जहागीर दिला; कन्हाड प्रांतांतील बावीस गांवांची देशमुखी दिली; आणि रणदुलाखान हा कर्नाटक प्रांतांमधून इ. सन १६३९ च्या सुमारास परत गेल्यानंतर शहानें त्यासच त्या प्रांताचा मुख्य अधिकारी नेमिले. या वेळेपा- सून शहाजी कर्नाटक प्रांतामध्यॆच स्थाईक झाला; तथापि पहिल्या पहिल्यानें पर्जन्यकाळी विजापूर येथें छावणीस यावें, व पर्जन्यकाल खलास झाल्यानंतर पुन्हां कर्नाटकांत मोहिमेवर जावें असा शहाजीनें कांहीं वर्षे क्रम ठेविला. तथापि पुण्याकडील जहागिरीवर त्याची विशेष भक्ति असून जिजाबाई व बाल- शेवाजी त्या ठिकाणी रहात असत. "जिजाबाईची त्यावेळी सुमारे चाळिशीची उमर असून, ह्यापुढे तिला संतति झाली नाही. संभाजी, शिवाजी, व एक मुलगी अर्शी तीनच अपत्ये तिचीं जगली होती. आणिक चार पांच अपत्यें तिला झाली म्हणून बृहदांश्वर शिलालेखकार लिहितो. तीं सर्व लहाणपणींच निवर्तली. शके १५२५ त लग्न झाल्यापासून शके १५५८ त शहाजी विजापुरास जाई तोपर्यंतच्या तेहतीस वर्षांत शिंदखेड, दौलताबाद, अहंमदनगर, परांडा, भीमगड, संगमनेर, त्र्यंबक, वैजापूर, जुन्नर, पुणे, कोंडाणा, व शेवटी माहुली अशा अनेक स्थलांचीं ऐश्वर्ये, संकटें, पळापळी, घराधरी, लढाया, खून, छापे, द्वंद्वयुद्धे इत्यादि भारततुल्य प्रसंग पाहून व सोहाळे भोगून शहाजीच्या धोर णाचा तिला पूर्ण अभ्यास व अनुभव आला होता. एक लढण्याची कला सोडून दिली तर बाकीच्या बहुतेक सर्व राजकीय कला शहाजीच्या इतक्याच तिच्या आंगवळणी पडल्या होत्या. अकबर, जहांगीर, शहाजहान, इब्राहीम अदिल- शादा, महंमद अदिलशादा, चांदबिबी, मलिकंबर, चांदबिबी, मलिकंबर, फत्तेखान, लोदी, मोहबतखान, नूरजद्दान, आसदखान, खवासखान, मुस्तफाखान, मूर्तुजा निजामशाहा, मासाहेब, बडी साहेबीण, मुरारपंत, चतुर साबाजी, ह्या मोंगलाई, निजामशाही व आदिलशाही प्रसिद्ध व्यक्तींचे गुणदोष तिनें प्रत्यक्ष पाहिले असून मालोजी, शहाजी, विठोजी, खेळोजी, लुकजी, अचलोजी, इत्यादि सासरमाहेरच्या मंडळींच्याहि प्रकृत्या तिनें अनुभविलेल्या होत्या.