पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     प्रकरण तिसरें.     ९१

वण करून देतो. पाहारा :-पाहारा ( रखवाली ) ह्या शब्दावरून प्रहरा प्रहराने पाहारेकरी बदलण्याची चाल असे असे व्यक्त होते. "राम राम" हा मराठे लोकांची व हलक्या जातीचे लोकांची कोणाशी भेट झाली असतां उच्चारावयाचा आनंदसूचक शब्द रामदास स्वामीमहाराजांच्या वैभवाची व त्यांच्यावर शिवाजीची असलेली भक्ति यांची आठवण करून देतो.

 अटक ( मर्यादा ) हा शब्द थोरला बाजीराव ज्याणे दिगंतव्यापिनी कीर्ति मिळविली व मराठ्यांचे नांव बलाढ्य अशा यवन पादशहास सुद्धां दहशत भरविणारे केले, त्या बाजीरावाच्या पराक्रमाची आठवण करून देतो. चाळिशी शब्दावरून आपल्या लोकांस उपनेत्र लावण्याची सरासरी मानाने कोणच्या वयांत जरूर पडते, हे व्यक्त होते. भोहणी शब्दावरून आपल्या व्यापारी लोकांची भवानीचें नांव घेऊन खरेदी, विक्री करावयाची चाल समजते. गवाक्ष ( गो+अक्ष ) शब्दावरून प्राचीनकाळीं खिडक्यांचा आकार कसा असे हे समजते. बेळगांव ( वेणुग्राम ) शब्दावरून पूर्वी तेथे चिव्यांचे ( म्ह० वेळूचे) रान निबिड होते, हे समजते.

 नणंद हा शब्द निषेधार्थक “ न" व सुखी होणे ह्या अर्थाच्या “नंद् " धातूपासून उत्पन्न झाला आहे. ननंद (नणंद ) म्हणजे “सुख न पावणारी " ; नणंद ह्या शब्दावरून नणंदाभावजयांचे हल्लीचे प्रमाणे पूर्वीपासूनही वैमनस्य असे, असे व्यक्त होते. नणंदेस आपण माहेरवाशीण आहों म्हणून घरांत आपली सत्ता असावी असे वाटत असते व भावजयीस आपण नेहमी घरांत असणारी व घरच्या यजमानाची बायको म्हणून घरधनीण आहों व अतएव आपली सत्ता घरच्या