Jump to content

पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     उपोद्घात.     

जोगी असली तर तो शब्द वृत्तगर्भ शब्दांच्या वर्गामध्येही समाविष्ट करण्याजोगा असेल; परंतु आम्ही जे तीन वर्ग केले आहेत ते न्यायशास्त्रदृष्ट्या परस्परांपासून अत्यंत भिन्न नसल्याकारणाने तसे होण्याचा संभव आहे हे उघड आहे.

 एथें दुसरे असे एक सांगणे इष्ट वाटते की, जगामध्ये कवित्व, नीति व इतिहास ह्यांशिवाय दुसरें कांहीं नाहीं, असे ज्या अर्थी नाहीं, त्या अर्थी शब्दांचे कवित्वगर्भ, नीतिगर्भ व वृत्तगर्भ इतके तीनच वर्ग करता येतील, अधिक येणार नाहीत, असें नाहीं. ह्या तीन वर्गाप्रमाणेच आचारगर्भ, विचारगर्भ वगैरे आणखी अनेक वर्ग बांधतां येतील, अशा वर्गाचा पूर्ण उहापोह करण्याची सामग्रीही आमच्याजवळ थोडी बहुत आहे व तिच्या आधारावर ग्रंथरचना केल्यास वाचकांस तीही मनोरंजक होईल असे आम्हास वाटते; परंतु भाषापरिज्ञानावर ह्या नमुन्याचा हा पहिलाच ग्रंथ असल्याकारणाने विषयाचे साकल्याने निरूपण करणे इष्ट नाही, असे आमचे मते आहे. एक तर ह्या विषयाची अभिरुची मराठी वाचकांस कितपत वाटेल ह्याची आम्हास कल्पना नाहीं, व ती अभिरुचि लोकांस नसल्यास आमचे श्रम व्यर्थ जातील. दुसरे कारण हें कीं, विद्वान् लोकांच्या दृष्टीने आमच्या विवेचनांत दोष काय काय आहेत हे अगोदर समजले असतां पुढे निर्दोष विवेचन करणे हे सोपे होईल. तिसरे असे की, ज्या सामग्रीच्या आधारावर ते विवेचन करावयाचे ती सामग्री कालगतीने वाढेल व निर्दोष होईल अशी आम्हास आशा आहे. ह्या व दुसऱ्या कांहीं कारणांसाठी आम्ही आमच्या सामग्रीचा कांहीं भाग मात्र प्रस्तुतच्या विवेचनास आधारभूत घेऊन कवित्वगर्भ, नीतिगर्भ व वृत्तगर्भ असे मुख्य तीन वर्ग करून प्रत्येकाच्या उहापोहास