पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे७२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

अवयव होते, हे सिद्ध होते व हे पुष्कळच शब्दांवरून सिद्ध होते. ह्या चारी भाषांमध्ये निषेधार्थक न, व धातूंचे अर्थ बदलणारे उपसर्ग सम्, परि, उपरि, प्र, अंतर्, हे समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये मास इत्यादि नेहमी प्रचारांत लागणारी कालगणनांची साधने दाखविणारे शब्द समान आहेत; ह्या चारी भाषांमध्ये दम् ( घर, दंपती ह्यांतील पहिला शब्द ) चाक वगैरे रानटी स्थितीतून वर चढून सुधारणेच्या पंथास लागलेल्या लोकांच्या व्यवहारांतील शब्द समान आहेत. ह्याशिवाय ह्या चारी भाषांमध्ये भूतलावर सर्वत्र आढळणाऱ्या पदार्थांचे व दुसरे कांहीं किरकोळ शब्द समान आहेत. पिता, माता, भ्राता, नातू, जांवई, सासरा इत्यादि अत्यंत जवळची नाती दाखविणारे शब्द समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, वीस, शंभर, प्रथम, एकदां, दोनदां, सहावा, सातवा, इत्यादि हरहमेश लागणारी संख्यावाचकें समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये "देव " हा शब्द समान आहे. ह्या चारी भाषांमध्ये, अभ्र, हिम्, ( हिंव ) आप् ( पाणी ) इत्यादि सृष्टीतील स्थूल चमत्कार दाखविणारे शब्द समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये गाय, अश्व, सूकर ( डुकर ) इत्यादि मनुष्यास अति उपयोगी किंवा लवकर माणसाळणारी जी जनावरे त्यांचे वाचक शब्द समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये शिर ( डोके ) आख, हृदय, दांत, अस्थि, पाय, जानु (गुडघा ), श्रोणी ( ढुंगण ), मन, वाचा, इत्यादि शरीराचे महत्वाचे भाग व इंद्रिये दाखविणारे शब्द समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये करणें, देणे, मरणे, स्था ( उभे राहणे ), भार घेणे, होणे, असणे, जाणणे, ताणणे, जन्मणे, बस् ( पांघरणे ), ओकणे, मिह् ( शिंपडणें ), सद् ( बसणे )