पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ६७

पूर्वेकडे जाणे भाग पडलें. कांहीं लोक तेथेच आपले वास्तव्य कायमचे करून राहिले व कांहीं पूर्वेकडे म्हणजे हिंदुस्तानांत येऊ लागले. अशा रीतीने पूर्व दिशेकडे प्रयाण करतां करता ते लोक थेट गंगा व ब्रह्मपुत्रा ह्या नद्यांच्या मुखांपर्यंत जाऊन ठेपले व अशा रीतीने सिंधु नदापासून तों तहत ब्रह्मपुत्रा नदापर्यंतचा सर्व प्रदेश त्यांनी व्यापून टाकला. वाटेत त्यांना जे मूळचे रहिवासी भेटले त्यांनी अडथळा केल्यास त्यांचा पराभव करून त्यांस डोंगरांत व रानांत, दऱ्यांत व खोऱ्यांत हांकून लावलें, व अडथळा न केल्यास त्यांना आपल्या समाजांत अंतर्भूत करून घेऊन त्यांनी कालावधीने सर्व प्रदेश आपलासा करून टाकला. त्यांचे वास्तव्य ह्या प्रदेशाने नियंत्रित असे एक हजार वर्षेपर्यंत होते. पुढे कांहीं साहसी व महत्वाकांक्षी लोकांच्या झुंडीच्या झुंडी विंध्यपर्वताचे दक्षिणेस येऊन दक्षिणेमध्ये कायमचे वास्तव्य करून राहिल्या; परंतु विंध्यपर्वताच्या उत्तरेस त्यांनी ज्याप्रमाणे मूळच्या रहिवाशांचा बहुतेक उच्छेद करून टाकला किंवा आपल्या समाजांत त्यांस अंतर्भूत करून घेतले किंवा हलक्या व रानटी स्थितीत राहावयास लावलें, त्याप्रमाणे त्यांस विंध्यपर्वताच्या दक्षिणेस करतां आलें नाहीं. मूळच्या रहिवाशांची जी मोठमोठी राज्ये होतीं तीं ह्या लोकांच्या बळापुढे टिकाव धरण्याइतकीं समर्थ असल्यामुळे म्हणा, किंवा कालगतीने ह्या आर्य लोकांचा प्राथमिक कस व कुवत नष्ट झाल्यामुळे म्हणा, किंवा त्यांच्या प्रकृति सौम्य झाल्यामुळे म्हणा, किंवा दाक्षिणात्यांच्या आरंभशूरत्वाचा प्रवाद रूढ करण्याकरितां म्हणा, हीं मूळच्या रहिवाशांची राज्ये व त्यांचे समाज व त्यांच्या भाषा ह्यांचा त्यांचे हातून उच्छेद झाला नाहीं. हीं पूर्वीप्रमाणेच कायम राहिंलीं. म्हणजे जुन्या लोकांचे समाज