पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     प्रकरण दुसरें.     ५९

 ३८. जंत :-त्याच प्रमाणे दुसरी एक गोष्ट विचार करण्याजोगी आहे. ज्या वस्तु जात्या अमंगळ किंवा बीभत्स किंवा हिडिस्स त्या वस्तूंचा सामान्य शब्दांनी, किंवा विप्रकृष्ट शब्दांनी निर्देश करणे हेही मानवी स्वभावास भूषणावहच होय. फार गोड खाल्यापासून कोठ्यामध्ये एक हिडिस्स लांब प्राणी उत्पन्न होत असतो, त्याला प्राणी ह्या अर्थाचा सामान्य शब्द जंतु हा लावतात. जंतु ह्याचा अपभ्रंश "जंत.”

 ३९. जीव, जिवाणु. -सापाला सुद्धा तसाच एक सामान्य शब्द जीव किंवा जिवाणु हा लावतात. सापाला किंवा नागाला आपण लांब जनावर असेही म्हणतों. ह्यांतील तरी बीज हेच आहे. लांब जनावर हा विप्रकृष्ट शब्द होय. त्या प्राण्याचे प्रत्यक्ष नांव न घेता त्याच्या लांबपणावरून "लांब जनावर " असे वर्णनात्मक नांव आपण त्यास दिलेले आहे. त्याचप्रमाणे रक्तपितीच्या हिडिस्स दुखण्यास महारोग किंवा थोरला रोग हे नांव दिलेले आहे. दारिद्र्याबद्दल आपण अक्काबाई म्हणतों. विधवेच्या प्राथमिक क्षौरास सोंवळी करणे म्हणतात. विधवेस सोंवळी म्हणतात. गतभर्तृकेस घरांत आलेली म्हणतात, हे सर्व प्रकार दु:खकारक वस्तूंचा सौम्य शब्दांनी निर्देश करण्याची जी मनाचीं प्रवणता तिची साक्ष देतात.

 अमंगळ, किंवा हिडिस्स वस्तूचा निर्देश करावयाचा तो सौम्य शब्दांनी करण्याकडे आपली प्रवृत्ति असते. तसेच मंगल व प्रियकर वस्तूच्या नाशाविषयी बोलावयाचे असतां, किंवा त्या वस्तूच्या संबंधानें निरुपायास्तव कांहीं अप्रिय भाषण करावयाचे असतां सुद्धां विप्रकृष्ट किंवा सौम्य किंवा मंगलात्मक शब्दच आपण घालतों. आपल्या बायकांस कुंकवाइतकी प्रिय वस्तु कोणतीच नाहीं. कुंकू हा शब्द त्यांच्या दृष्टीने पति ह्या