पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

प्रमाणे राहाटी चाललेली असते. ही राहाटी मनुष्याच्या अंगीं जो बीभत्स वस्तूचा प्रत्यक्ष रीतीने उल्लेख न करतां दुरून दुरून उल्लेख करण्याचा कल असतो, त्याची मोठी प्रशंसार्ह रीतीने साक्ष देते. ह्या राहाटीचे एक उत्कृष्ट उदाहरण आपणास "शौच" ह्या शब्दांत दृष्टीस पडते. कोठा साफ करण्याच्या क्रियेस जो पूर्वी शब्द होता तो लोकांस ग्राम्य वाटू लागल्यावर त्याचे जागीं “स्वच्छ करणे" ह्या अर्थाचा साधा शौच हा शब्द प्रतिष्ठित संभाषणांत वापरण्यांत येऊ लागला. कालांतराने पुढे त्या “शौच" शब्दाचे बीभत्स वस्तूशीं सदैव साहचर्य झाल्यामुळे तो अप्रतिष्ठित ठरला व त्याच्या जागीं त्याच्याही पेक्षा मोघम म्हणजे अर्थात् विप्रकृष्ट असा “परसाकडे जाणे" असा शब्द प्रतिष्ठित लोकांच्या उपयोगांत येऊ लागला, “परसाकडे " म्हणजे केवळ परसाच्या बाजूस जाणे हा सुरेख शब्द प्रचारांत आला; परंतु हल्लीं तो शब्द बीभत्स वस्तूच्या साहचर्याने अप्रतिष्ठित ठरून आपण त्याच्या जागी "शौच" हा मागे पडलेला शब्द अदबीच्या भाषणांत योजें लागलो आहों, |

 २८, भद्रलक्षणी, भद्रकपाळी.- हे शब्द वाईट अर्थाने योजले जातात. त्यांचा वैयुत्पत्तिक अर्थ चांगला असून त्यांची वाईटाकडे लक्षणेने योजना होऊ लागली. “आमचा बाव्या काय शहाणा आहे म्हणून सांगू? आई देवाला गेली होती अशी संधि साधून त्याने पेटीला किल्ली चालवून पैसे चोरून त्यांचे चुरमुरे आणून खाल्ले, इतका प्रतापी" ह्या वाक्यामध्ये " शहाणा" आणि “प्रतापी" हे शब्द लक्षणेनें योजलेले आहेत, असाच लाक्षणिक उपयोग भद्रलक्षणी व भद्रकपाळी ह्यांचा प्रथम होत असे; परंतु पुढे पुढे त्यांच्या