पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे४०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

 २. साथी. - मनुष्यांचा एकोपा झाला असता त्यांचे हातून एकादें परोपकाराचे किंवा सार्वजनिक उपयोगाचे कृत्य न होतां दुसऱ्यास फसविणे, दुसऱ्यास पीडा देणे, हेच परिणाम आधिक वेळां होत असल्याकारणाने साथी या शब्दाचा पूर्वीचा बरोबर असणारा असा अर्थ नष्ट होऊन वाईट कृत्यांतील मदतनीस असा त्याचा अर्थ होणे हे साहजिकच आहे.

 असो. तर मनुष्याच्या अवनत स्थितीमुळे अवनत झालेले शब्द मराठींत शेंकडों आहेत. आपणास असे आढळून येईल कीं, शब्दांच्या वाच्य वस्तूंस अवनति प्राप्त झाल्यावरून त्यांचे वाचक शब्दही पूर्वी चांगल्या अर्थाचे किंवा उदासीन अर्थाचे असतां क्रमाक्रमाने अवनत झालेले आहेत. आपण उदाहरणासाठी अशा प्रकारचे कांहीं शब्द घेऊ.

 ३. कळवंतीण. - हा शब्द कलावती शब्दाचा अपभ्रंश आहे. कलावती ह्याचा पूर्वीचा अर्थ नर्तन, वादन, गायन वगैरे कलांमध्ये प्रवीण अशी स्त्री, असा आहे. परंतु गायननर्तनाचा धंदा करणाऱ्या स्त्रियांच्या अंगीं साहजिकरीत्या येणाऱ्या बहुपुरुषसेवन, नीचजनसहवास वगैरे दुर्गुणांवरून कलावंतीण ह्याचा अर्थ परपुरुषलोभनार्थ प्रसाधनविधींत लक्ष देणारी स्त्री, वेश्या, किंवा धंद्याचे पांघरुणाखालीं परपुरुषसेवन करणारी, असा झाला आहे.

 ४. उचल्या. - भलत्याच ठिकाणी पडलेला पदार्थ एकादा मनुष्य उचलतो, तेव्हां तो पदार्थ योग्य स्थळीं ठेवण्यापेक्षा किंवा ज्याचा त्यास देऊन टाकण्यापेक्षा, स्वत:च्या उपयोगाकरितां तो आपल्याच जवळ ठेवण्याकडे त्याची अधिक प्रवृत्ति झालेली पाहण्यात येते. ह्या कारणाने उचल्या हा शब्द खिसेकापू किंवा हलक्या चोऱ्या करणारा ह्या अर्थाचा झाला.