पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे     प्रकरण पहिलें.     २१

पाहून आपणास जसे आश्चर्य व कौतुक वाटते, त्याप्रमाणेच आपल्या पूर्वजांस लेखनकलेच्या उत्पत्तिसमयीं पत्रांदिकांची विचार प्रकट करण्याची अद्भुत शक्ति पाहून आश्चर्य व कौतुक वाटली असावी. दक्षिण महासागरांतील एका बेटांत राहणाऱ्या एका मनुष्यास विल्यम्स् ह्या नांवाच्या पाद्र्याने जो लांकडाचा ढलपा दिला त्याने त्याच्या बायकोस " गुण्या पाठवून द्यावा" हा मजकूर कळविला हे पाहून त्या आश्चर्यचकित रानटी मनुष्याचा उद्गार निघाला, “ काय ! ढलपे देखील बोलते करतां येतात काय ?" अशा प्रकारचे आश्चर्य आपल्या पूर्वजांस वाटून त्यांनी वाचय् असे नांव ह्या वाचण्याच्या क्रियेस दिले. आनंद व आश्चर्य ह्या मनोविकारांनी हृदयास उचंबळा आणून निर्जीव पदार्थाचे ठायीं सजीवत्वाचा साहजिक रीत्या आरोप करविणारी जी शक्ति तेच कवित्व होय असे जर आपण कबूल करतो, तर वाचंय् हा शब्द ज्या पुरुषाने प्रथम योजला त्याचे ठायीं कवित्व नव्हते असे आपणास म्हणवेले काय? त्याणे एका लहानशा शब्दामध्ये केवढे कवित्व दाखविले आहे?

 २. भांगाचे पाणी.-- कोंकणामध्ये अष्टमीच्या भरतीस भांगाचे पाणी असे म्हणतात. समुद्रास भरती ओहोटी होतात त्या चंद्रसूर्याच्या आकर्षणामुळे होतात, हें ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्यांस ठाऊक आहे. पौर्णिमेस व अमावास्येस जी भरती येते ती नेहमीपेक्षा मोठी असते. कारण चंद्र व सूर्य ह्या दोघांच्याही आकर्षणशक्तीचा परिणाम पाण्यावर एकाच रेषेत घडत असतो. परंतु अष्टमीच्या दिवशी चंद्र व सूर्य ह्यांच्या आकर्षणरेषा एकमेकींवर लंब असल्यामुळे चंद्राच्या आकर्षणाचा जोर सूर्य कमी करतो व सूर्याच्या आकर्षणाचा जोर चंद्र कमी