पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     प्रकरण पहिलें.     १९

प्रसन्न होते तसे शब्दगत कवित्वानें कां होत नाहीं ? भाषेमध्ये कवित्वगर्भ शब्द पुष्कळ असतात, व प्रत्येक कवित्वगर्भ शब्दांत कमी जास्ती प्रमाणाने किंवा कमी जास्ती मनोहर प्रमाणानें कवित्व संचित झालेले असते, तथापि ह्या कवित्वगर्भ शब्दांतील कवित्वाचा आस्वाद आपणास कां प्राप्त होत नाहीं? ह्या आस्वादाचे स्वारस्य आपणास प्राप्त न होण्याची दोन कारणे आहेत. एक तर ह्या शब्दगत कवित्वाचे अस्तित्वच आपणास अवगत नसते. तें कवित्व कोणी तरी उकलून बाहेर काढून त्याची प्रतीति नजरेस आणून दिल्याखेरीज ते आपणास समजेल असे नसते. आणि दुसरे कारण असे की, ते कवित्वगर्भ शब्द आपल्या नेहमीच्या परिपाठांतले असल्याकारणाने चिरपरिचितत्वाचा परिणाम त्यांच्यावर घडून येतो. उघडच आहे की, एकादी वस्तु कितीही सुंदर असली तरी ती नेहमीं आपल्या डोळ्यापुढे असल्याकारणाने तिच्याविषयींचा आदर आपल्या मनांतून नाहीसा होतो, किंवा निदान कमी तरी होतो, आणि त्या सुंदर वस्तूच्या प्राथमिक अवलोकनाने होणाऱ्या आनंदाचा तीव्रपणा व मोहकपणा हीं कालांतराने नष्ट होतात, किंवा कमी होतात. शब्दगत कवित्वाकडे आपले लक्ष्य गेलेले नसले, किंवा त्याचे विषयींचा आदर आपल्या मनांतून नष्ट झालेला असला, तरी त्या शब्दांत कवित्व नाहीं, किंवा कवित्व नष्ट झाले, असे म्हणतां यावयाचें नाहीं. परंतु उलट पक्षी असेही म्हणण्यास काही हरकत नाहीं कीं, खरी सहृदयता ज्यास आहे त्यास अशा कवित्वगर्भ शब्दांपासून अधिक अधिकच आनंद होत जातो. एका कवीने म्हटले आहेः--

  प्रतिक्षणं यन्नवतामुपैति
  तदेव रूपं रमणीयतायाः ॥