पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे१२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

कामें पतकरावी लागली. त्यामुळे अर्थातच ब्राह्मण हा मोठा अभिमानव्यंजक शब्द आचारी व पाणक्ये ह्यांचा वाचक झाला आहे. ब्राह्मण शब्दाचा असा अर्थ महाराष्ट्रांत प्रचारांत आहे. ब्राह्मण शब्दाचा एक उन्नत अर्थही झाला आहे हे पुढे दाखविण्यांत येईल.

 शब्दांच्या अर्थाच्या, अवनतीचे राग हा शब्द एक उत्कृष्ट उदाहरण आहे. राग ह्या शब्दाचा संकृतांत तांबडेपणा ( लालपणा ) असा मूळचा अर्थ आहे. पुढे त्यापासून प्रीति असा अर्थ झाला. कारण अंतःकरणांत प्रेमरसाची उकळी फुटली असतां चेहऱ्यावर गुलाबी रंगाची छटा मारते. आणि कार्यवाचक शब्दाची योजना सहजच कारणाबद्दल होऊं लागून राग हा शब्द प्रेमाचा वाचक झाला. परंतु मराठींत राग ह्याचा अर्थ क्रोध असा आहे, आणि हा अर्थ मूळच्या अर्थाहून अगदीं विपरीत असा आहे. हा अर्थ त्यास कसा प्राप्त झाला ? प्रेमभराने चेहऱ्यावर जशी लाली येते तशी क्रोधानेही येते. परंतु प्रेमाच्या लालीपेक्षां क्रोधाचीच लाली चेहऱ्यावर अधिक प्रसंगीं दृष्टोत्पतीस येते, व प्रेमापेक्षां क्रोधच प्रबलतर असतो. यावरून राग हा लालीचा वाचक शब्द असून क्रोधाचा वाचक झाला, व त्याचा संस्कृतांतील प्रेम हा लाक्षणिक अर्थ नष्ट झाला. ज्या लक्षणेने राग हा लालीचा वाचक शब्द असून संस्कृतांत प्रेमाचा वाचक झाला, त्याच लक्षणेनें तो मराठीत क्रोधाचा वाचक झाला. ही त्या शब्दाच्या अर्थाची अवनति प्रत्येक मनुष्याने लक्ष्यांत बाळगण्याजोगी आहे. आपल्या चांगल्या मनोविकारांपेक्षां दुष्ट मनोविकार जसे संख्येने अधिक आहेत, तसेच ते बळानेही अधिक आहेत. ह्याची राग