पान:मराठी रंगभुमी.djvu/218

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८४
मराठी रंगभूमि.


खरें चित्र प्रेक्षकांपुढें मांडण्याविषयीं व विशेषत: नाटकापासून लोकांनीं काय बोध घ्यावा हें समजून देण्याविषयीं नाटककर्त्यानें विशेष खबरदारी घेतली पाहिजे. हें काम ग्रंथकर्त्याचें आहे व नाट्यशास्त्राचा अभ्यास करूनच हे गुण त्यानें आपल्या आंगीं आणले पाहिजेत. त्यासंबंधानें विशेष विवेचन करण्याचें हें स्थल नव्हे. असो; प्रयोगाची छाप लोकांवर पडण्यास नाटकवाल्यांनीं काय काय केलें पाहिजे याचेंही थोडक्यांत येथें विवचन करितों.
 (१) नाटक कंपनींत मुख्यत्वेंकरून सुशिक्षित पात्रें असलीं पाहिजेत. पुष्कळ कंपन्यांत अशिक्षित लोकच फार असल्यामुळें, त्यांतून कित्येकांना धड लिहितां वाचतांही येत नसल्यामुळे नाटकाचें मर्म त्यांना मुळींच कळत नाही. अर्थात त्या त्या रसास अनुकूल अशा प्रकारचा अभिनय किंवा भाषण त्यांच्या हातून हात नाहीं. एवढेच नव्हे तर, वाक्यांत भलत्याच ठिकाणच्या शब्दावर जोर देऊन किंवा भलताच अभिनय करून विरस उत्पन्न करितात. आजपर्यंतच्या नाटकमंडळींकडे पाहिलें तर सुशिक्षित पात्रें असणारी एकही कंपनी होऊन गेली नाहीं. फार कशाला? ज्या शाहुनगरवासी मंडळीचा बुकिश नाटकें करण्याबद्दल आज एवढा लौकिक झाला आहे त्यांतील मुख्य मुख्य पात्रांकडे पाहलें तर तीं सुद्धां बेताबताचींच आहेत असें