Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७८
मराठी रंगभूमि.


उत्तेजन मिळेनासें झालें आहे. आजपर्यंत या कॉलेजांतील बक्षिसाच्या निमित्तानें सरासरी मराठी भाषेत १५० नाटकं तरी आस्तित्वांत आलीं आहेत. पण ही वाढ हल्लीं खुंटली आहे. करितां त्या कॉलेजानें आपला पूर्वीचा क्रम पुन्हां सुरू केल्यास नाट्यकलेचें व त्याबरोबर महाराष्ट्र भाषेचेंही पुष्कळ हित होणार आहे. इतर कॉलेजांनीही ही गोष्ट करण्याचें मनांत आणिल्यास पुष्कळ फायदे होतील.
 बुकिश नाटकांकडे सूक्ष्म रीतीनें अवलोकन केलें ह्मणजे असें दिसून येतॆ कीं, प्रथमतः प्रथमतः शेक्सपियरादि आंग्लकवींच्या व कांहीं संस्कृत कवींच्या नाटकांचीं भाषांतरेंच मराठींत पुष्कळ झालीं व असें होणेंही स्वाभाविक होतें. पुढें हळूहळू स्वतंत्र रीतीचीं बुकिश नाटकें मराठींत होऊं लागलीं. पण अशा नाटकांत चांगलीं नाटकें फार थोडीं आहेत. या थोड्या नाटकांतच रा. देवल यांच्या दुर्गा नाटकाची गणना होते, व त्याची बरोबरी करणारें आजमितीस मराठी भाषेत दुसरें नाटक कचितच सांपडेल. मराठी भाषेत दुर्गेसारखीं किंवा त्याहून सरस नाटकें निपजण्यास आमच्या ग्रंथकारांनीं नाट्यकलेचा अभ्यासच केला पाहिजे. ' घे लेखणी कीं लिही नाटक ' अशानें चांगलें नाटक कधींही निपजणार नाहीं. नाटकाचा हेतु साध्य होण्यास कोणकोणत्या तहचीं पात्रे व प्रसंग घातले पाहिजेत,