पान:मराठी रंगभुमी.djvu/144

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
मराठी रंगभूमि.


ही व्यवहारिकच आहेत. चारुदत्ताचा प्रामाणिकपणा, धीरोदात्त आणि उदार स्वभाव, वसंतसेनची गुणग्राहकता व चारुदत्तावरील निष्कपट प्रेम, मैत्रेयाची चारुदत्ताबद्दल खरी मैत्री, शकाराचा कांहीं अंशीं कपटी आणि धूर्त स्वभाव व कांहीं अंशीं मूर्व स्वभाव इ. गोष्टी या नाटकांत मोठ्या मार्मिकपणानें वर्णन केल्या असून शृंगार, करुण, हास्य हे मुख्य रस यांत फारच चांगल्या रीतीनें साधले आहेत; व ठिकठिकाणीं उज्जनी नगरींतील प्राचीन चालीरीति, लोकस्थिति, व्यवहार इत्यादिकांची ओळख पटेल अशा प्रकारचीं पात्रे व स्थलें यांची योजना केली असल्यामुळे एकंदर नाटक बहारीचें होऊन शूद्रक कवीच्या आंगच्या कल्पना, कवित्व, संविधानक-रचना-चातुर्य इ. गुणांबद्दल मार्मिक प्रेक्षकांकडून तारीफ झाल्यावांचून कधीही राहणार नाहीं. अशा या अत्युत्तम नाटकाचें गद्यपद्यात्मक भाषांतरही रा.देवल यांनीं चांगलें वठविलें आहे. रा. देवल यांची कवित्वशक्ती चांगली असून या नाटकांतील पद्यांत शब्दांची मजेदार ठेवण व प्रसाद हे गुण चांगले साधले आहेत. या नाटकांतील बहुतेक पद्ये रा. किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांतील पद्यांच्या चालींवर असून हें नाटक विशेष रीतीनें पुढे आणण्यास वरील 'नाट्यानंद'मंडळीच कारणीभूत होय. या मंडळींत रा. केशवराव बडोदेकर हे चारुदत्ताचें काम करीत होते; व त्यांची आवाजी कांहीं अंशों कडक होती तरी ती घटून गेली असल्यामुळे व त्यांची ह्मणण्याची