पान:मराठी रंगभुमी.djvu/134

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११६
मराठी रंगभूमि.


डोंगरे यांची कंपनी.

कै. आण्णा किर्लोस्कर यांनीं संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग केल्यावर लगेच पुढें चार पांच महिन्यांनीं ह्मणजे इ. स. १८८२ च्या एप्रिल महिन्यांत रा. वासुदेव नारायण डोंगरे* यांनीं मुंबईस संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून दाखविला. हा प्रयोग आण्णांच्या शाकुंतल नाटकावरून केला नसून रा. डोंगर यांनीं मूळ संस्कृत नाटकाचें नवें भाषांतर व नवीं पद्ये घालून केला. रा. डोंगरे यांची कवित्वशक्ति चांगली असून त्यांच्या नाटकांत " भिन्नरागदर्शन विशिष्ट आहे," ह्मणजे गवई लोक चिजा गातात त्या पद्धतीवर रागबद्ध पद्यांची रचना केली आहे. यांच्या कंपनींतही किर्लोस्कर कंपनीप्रमाणें एक दोन गवयी असून रा. घारपुरे, पेरे, बाळकृष्णबुवा मिरजकर अशासारख्या गवयांनीं


 * डोगरे यांचा जन्म शके १७७२ च्या वर्षप्रतिपदेच्या दिवशीं रत्नागिरी जिल्ह्यांत वाडाजून येथें झाला. यांचा म्याट्रिक्युलेशनपर्यंत इंग्रजी अभ्यास मुंबईच्या विल्सन शाळेंत झाला. हे 'सुज्ञानबोधक, ' ' स्वदेशपत्र, ' ' सत्यमित्र ' वगैरे पत्रांतून लेख लिहीत असत. पुढें संस्कृतचें अध्ययन करुन इ. स. १८८० मध्यें त्यांनीं नाटकें लिहिण्यास सुरवात केली, व नाटककंपनी काढून सरासरी इ. स. १८९५ पर्यंत त्यांनीं तो धंदा चालविला. यांचें आतां उतार वय झालें आहे; तरी मधून मधून इतर नाटककंपन्यांस कांहीं नाटकें रचून देतातच.
 रा. डोंगरे यांनीं शाकुंतल नाटकाचे पहिले चारच अंक केले आहेत.