पान:मनू बाबा.djvu/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला म्हणतील व हिणवतील. मनू, केलसं तर केलसं, परंतु पुन्हा निरपराधीपणाचा आव आणू बघतोस हे तर फारच वाईट. हातून पाप झालं तर कदाचित दु:खाच्या लहरीत, उदासीनतेच्या लहरीत, वेडाच्या लहरीत केलं असशील हे पाप. परंतु ते कबूल करून गावाची क्षमा मागण्याऐवजी तू दंभ दाखवीत आहेस, काय याला म्हणावं?"

 आपल्या मित्राच्या तोंडचे ते शब्द ऐकून मनूचे तोंड काळवंडले. जिथे त्याची सर्व आशा तिथेच निराशा पदरी आली. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यानेही आपल्याविषयी गैरसमज करून घ्यावा ह्यासारखे दुनियेत दुसरे दु:ख नाही, तो सर्वांत प्रखर असा प्रहार असतो.

 सभा संपली. मनूला 'खूनी मनू' म्हणून संबोधण्यात येऊ लागले. मनू घरातून बाहेर पडेना. एके दिवशी रात्री सायगाव सोडून जाण्याचे त्याने ठरविले. 'या जगात न्याय नाही, सत्य नाही, प्रेम नाही काही नाही!' जगात देव नाही, धर्म नाही मरता येत नाही म्हणून जगायचे. जग म्हणजे एक भयाण वस्तू आहे असे त्याला वाटले.

 मध्यरात्रीचा समय. सर्वत्र अंधार होता. मनूच्या मनात बाहेरच्या अंधाराहूनही अधिक काळाकुट्ट असा अंधार पसरला होता. परंतु तो उठला. ते पूर्वजांचे घर सोडून तो निघाला. जेथे त्याच्या आईबापांनी त्याला वाढविले, जेथे आपली पोरकी बहीण त्याने प्रेमाने वाढविली, असे ते घर सोडून तो निघाला. त्याला वाईट वाटले; त्याच्या डोळ्यांतून पाणी आले. परंतु शेवटी प्रणाम करून त्याने घराबाहेर पाऊल ठेवले. तो रस्ता चालू लागला. बहुळा नदीच्या तीरावर तो आला. त्या नदीत तो कितीदा तरी डुंबला असेल. मित्राबरोबर पोहला असेल. बहुळेच्या काठी एका खडकावर तो बसला. वरती तारे चमचम करीत होते. मनूच्या मनात शेकडो स्मृती जमल्या होत्या. हृदयात कालवाकालव होत होती. मोठ्या कष्टाने तो उठला. त्या मध्यरात्री बहुळेचे तो पाणी प्यायला. पुन्हा एकदा गावाकडे वळून त्याने प्रणाम केला. बहुळेला प्रणाम केला आणि वेगाने निघाला. लांब लांब जाण्यासाठी मनू निघाला. जेथे त्याला कोणी खुनी असे म्हणणार नाही तेथे जावयास तो निघाला. मातृभूमीला रामराम करून तो निघाला.


८ मनूबाबा