Jump to content

पान:मनू बाबा.djvu/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येईल का घेता? त्यासाठी का बरेच पैसे पडतील?" सोनीने मनूबाबाच्या गळ्याला मिठी मारून विचारले.

 "घेऊ हो जागा. करू हो बाग. मग सोनीच्या केसात रोज फुलं. रोज गजरे." मनूबाबा हसून म्हणाला.

 "रामूच्या आईच्या देवांनाही होतील, आणि मी गुच्छ करून तुम्ही विणता तेथील खिडकीत ठेवीन. तुम्हांला विणताना छान वास येईल, नाही? पण बाबा, एक अट आहे. तुम्ही नाही हो बागेत काम करायचं. तुम्ही दमाल. तुम्ही आम्हांला सांगा बाग कशी करायची ते. रामू व मी दोघंजणं काम करू." ती म्हणाली.

 "काम करता करता भांडू लागाल." तो हसून म्हणाला.

 "आता का आम्ही लहान आहो भांडायला?" तिने हसून विचारले.

 "मग तू का मोठी झालीस? अहा रे मोठी सोनी." मनूबाबा म्हणाले.

 "खरंच बाबा. मी काही लहान नाही. आता मी झाले बाबा मोठी" ती म्हणाली.

 आणि खरेचं, सोनी आता मोठी होत चालली होती व रामूहि मोठा होत चालला होता. एके दिवशी रामू व सोनी दोघेजणे बसली होती.

 "सोन्ये, तुला मी एक विचारू?" त्याने गंभीरपणे प्रश्न केला.

 "विचार ना. माझी परवानगी कशाला?"

 "तू रागावशील."

 "आता का मी लहान आहे? भातुकली खेळत असे तेव्हा रागावत होते. तेव्हा मी लहान होते."

 "आता तू मोठी झालीस."

 "आणि तूसुद्धा मोठा झालास."

 "म्हणूनच तुला मी काहीतरी विचारणार आहे."

 "जे विचारणाराहेस ते का मोठं झाल्यावरच विचारायचं असतं?"

 "हो."

 "मग विचार."

सोनी * ४३