पान:मनू बाबा.djvu/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्हांला शिकवायचं असेल. सोन्यापेक्षाही सुंदर अशा पुष्कळ गोष्टी जगात आहेत. नुसतं सोनं जमवून काय कामाचं? ते कोणाच्या उपयोगी आलं तर उपयोग. नाही तर दगड नि सोनं सारखीच किंमत. ती बाहेर माती पडली आहे, तसं तुमचं सोनं घरात पडलेलं होतं. देव हे तुम्हांला शिकवू पाहात होता. देव दयाळू आहे. कदाचित् तुमचं सोनं परत येईल. ते येवो, न येवो. परंतु चार पणत्या लावा. दिव्यांच्या ज्योती सोन्यासारख्या झळकतात. उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी चार दिवे लावा, आणि ह्या सांजोऱ्या व हे अनरसे मी आणले आहेत, ते ठेवा. रामूसाठी सारं सारं करावं लागतं. सण सर्वांचा आहे. गरिबी असली तरीही सण साजरा करावा. थोडं गोडधोड करावं. आनंद करावा. खरं ना मनूबाबा?" साळूबाई म्हणाली.

 ती निघून गेली. दुसरे दिवशी मनूबाबाने खरेच चार दिवे लावले. सुंदर पणत्या झळकू लागल्या. मनुबाबाने आपली झोपडी झाडून स्वच्छ केली. 'आज गेलेली लक्ष्मी परत येईल. हो, येईल. माझ्या प्रेमाचे, माझ्या श्रमांचे होते ते पैसे. त्या माझ्या मोहरा परत येतील. ते सारं सोनं परत येईल. ते मी हृदयाशी धरीन.' असे विचार त्या विणकऱ्याच्या मनात घोळत होते.

 गावात लक्ष्मीपूजनाचा महोत्सव सुरू होता. दिगंबरायाकडे तर सर्वात मोठा उत्सव. या दिवशी त्यांच्याकडे गावातील सारे लोक जमत. आसपासच्या खेड्यापाड्यांतील मित्र येत. त्यांची कुळेही येत. बैठका घातलेल्या होत्या. तक्क्ये लोड होते. सुंदर समया तेवत होत्या. पान-सुपारीची तबके होती. मंगल वाद्ये वाजत होती. अत्तर; गुलाब होते. बार वाजत होते. दारूकाम सोडले जात होते. संपतराय सर्वांचे स्वागत करीत होता. दिगंबरराय पूजा करीत होते. ठकसेन त्या वादळाच्या दिवसापासून कोठे गेला तो गेला. मेलेली घोडी मात्र आढळली. परंतु ठकसेनाचा पत्ता नाही. त्याच्यावर कोणाचे फारसे प्रेम नव्हतेच. त्यामुळे तो घरी नव्हता तरी कोणाला रूखरूख वाटली नाही.

 दिगंबरायांकडे दलपतराय व त्यांची मुलगी इंदुमती हीही आली होती. इंदुमती प्रेमाने संपतकडे बघत होती. त्यालाही आनंद होत होता. संपतच्या

                                             सोने परत आले *२५