पान:मनू बाबा.djvu/2

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मनू विणकर होता. विणण्याची कला त्याच्या बोटांत होती. धाकटी बहीण होती. तेव्हा तिच्यासाठी तो विणी. पैसे मिळवून बहिणीला नटवी. पुढे-मागे बहिणीचे लग्न करावे त्यासाठी तो पैसे साठवी. परंतु बहीण देवाकडे निघून गेल्यावर मनू फारसे काम करीत नसे. देवाने त्याच्या जीवनाचे वस्त्र जणू दु:खाने विणले होते. ते दु:खाचे वस्त्र पांघरून मनू घरी कोपर्‍यात बसे विनू येई तेव्हा मात्र तो जरासा हसे.

 असे काही दिवस गेले. एकदा काय झाले, त्या गावात एक परका पाहुणा आला. त्याच्याजवळ बरेचसे पैसे होते. विनूला पैसे पाहिजे होते. विनूच्या मनात पाप आले. त्या श्रीमंताचा खून करावा असे त्याच्या मनात आले. शेवटी त्याने संधी साधून त्या श्रीमंताचा खून केला. त्याची पिशवी त्याने लांबविली. परंतु खून पचवायचा कसा?

 विनूने रक्ताने माखलेला सुरा मनूच्या उशाशी ठेवून दिला. मनू झोपलेला होता. विनू मुकाट्याने आपल्या घरी जाऊन पडला. सकाळ झाली. प्रवासी मरून पडलेला दिसला. सर्व गावभर वार्ता गेली. कोणी केला तो खून? कोणी केले ते पाप?

 मनू जागा झाला. त्याच्या उशाशी रक्ताने माखलेला सुरा होता; तो दचकला. तो सुरा हातात घेऊन तो वेड्यासारखा बाहेर आला. लोक त्याच्याकडे पाहू लागले.

 "हा पाहा लाल सुरा, रक्तानं रंगलेला सुरा! कुणाचं हे रक्त? कुठून आला हा सुरा? माझ्या उशाशी कुणी ठेवला? लाल लाल सुरा." असे मनू बोलू लागला.

 "यानंच या प्रवाशाचा खून केला असेल."

 "आणि स्वत: साळसूदपणा दाखवीत आहे."

 "त्याला खून करून काय करायचं होतं?"

 "देवाला माहीत. एकटा तर आहे. पैसे हवेत कशाला?"

 "लोभ का कुठं सुटतो?"

 असे लोक म्हणू लागले. मनूला काही समजेना. तो वेड्याप्रमाणे बघू लागला.

 "मी कशाला कोणाला मारू? मी आधीच दुःखाने मेलो आहे. मला कशाचीही इच्छा नाही. ना धनाची, ना सुखाची! कोणी तरी

६ * मनुबाबा