पान:मनू बाबा.djvu/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समजशील व झोपून राहाशील. सासू मग बोलेल, रागावेल." साळूबाई म्हणाली.

 "मारणार नाही ना ?" हसून सोनीने विचारले.

 "मारील सुद्धा. काही काही सास्वा खाष्ट असतात हो, सोन्ये. तयार रहा. लाड नाही मग तिथं चालायचे !" रामू म्हणाला.

 "पण मी अशी सासू मिळवीन, जी माझी जणू आई होईल. मी थंडीत लवकर जायला लागले तर जी म्हणेल, की नीज हो जरा आणखी, लहान आहेस तू." सोनी म्हणाली.

 "अशी सासू मिळायला पुण्याई लागते." रामू म्हणाला.

 "आहेच माझी पुण्याई. आणि माझी पुण्याई नसली तरी मनूबाबांची आहे. माझ्या आईचा आशीर्वादही माझ्याजवळ असेल. नाही का हो बाबा ?" सद्गदित होऊन सोनीने विचारले.

 "आहे हो तुझ्या आईचा आशीर्वाद." म्हातारा म्हणाला.

 "रामू, जा आता कामावर. वेळ झाली." साळूबाई म्हणाली.

 रामू निघाला. सोनी त्याला दारापर्यंत पोचवायला गेली. रामू मागे वळून पाहात होता. सोनी तेथेच उभी होती. रामू वळला, दिसेनासा झाला. तरी सोनी तिथेच उभी होती.

 घरात साळूबाई व मनूबाबा दोघे होती. साळूबाई जायला निघाली, परंतु म्हाताऱ्याने तिला थांबवले.

 "साळूबाई. जरा थांबा. थोडं बोलू आपण." तो म्हणाला.

 "घरी चुलीवर दूध आहे. उतास जाईल." ती म्हणाली.

 "सोनीला पाठवू. ती दूध उतरून ठेवील." म्हातारा म्हणाला.

 "बरे तर. सोने. अगं सोन्ये !" तिने हाक मारली.

 "काय रामूच्या आई ?" सोनीने येऊन विचारले.

 "आमच्या घरी जा व तेवढं चुलीवरचं दूध तापलं म्हणजे उतरून ठेव. झाकून ठेव. भाकऱ्याही झाकल्या नसतील तर झाकून ठेव. मी लवकरच येत्ये म्हणून सांग. त्यांना थोडा चहा हवा असला तरी करून दे. अलीकडे त्यांना जरा दमा लागतो. तुला येतो की नाही करता ?" साळूबाईने विचारले.

सोनीचे लग्न * ६५