Jump to content

पान:मनू बाबा.djvu/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इतक्यात संपतराय तेथे आले. लोक बाजूला झाले. त्यानी तो मूर्त आकार पाहिला! इतर सर्व वस्तू पाहिल्या. ते गंभीरपणे उभे राहिले.

 "माझाच भाऊ, देव त्याला क्षमा करो. मनूबाबा, तुम्हीही क्षमा करा." संपतराय दुःखाने म्हणाले.

 संपतरायांनी त्या अवशेषांस अग्नी दिला. सारे लोक परतले. संपतरायही घरी आले. गावात चाललेली गडबड इंदुमतीच्या कानी आली. परंतु सारा वृत्तान्त नीट तिला कळला नव्हता. संपतराय आले व आपल्या खोलीत खिन्नपणे बसून राहिले.

 "काय आहे गडबड, काय आहे हकीगत? तुमचा चेहरा असा का काळवंडला? सांगा ना सारं." इंदुमतीने आस्थेने विचारले.

 "काय सांगू? त्या विणकराचं सोनं पंधरा वर्षापूर्वी चोरीस गेलं होतं, ते माझ्या भावानं चोरलं होतं.पंधरा वर्षांनी सत्य उघडकीस आलं. तुझ्या पतीचा भाऊ चोर निघाला. चोराच्या भावाशी तू लग्न लावलंस. माझ्यामुळं, आमच्यामुळं तुला कमीपणा. तुझं माहेर मोठं, घरंदाज. थोर कुळातील तू. माझ्याकडे आता तू आदराचे पाहू शकणार नाहीस. चोराचा भाऊ असं तुझ्या मनात येईल. काय करणार मी?" असे म्हणून संपतराय केविलवाण्या दृष्टीने पाहू लागले. थोडा वेळ कोणी काही बोलले नाही.

 नंतर इंदुमती पतीचा हात प्रेमाने आपल्या दोन्ही हातांनी धरून म्हणाली, "तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तुमचा भाऊ असा निघाला त्यात तुमचा काय दोष? घराण्याला थोडा कमीपणा येतो; परंतु काय करायचं? मामंजी आज हयात नाहीत हे एका दृष्टीने बरं. नाही तर त्यांच्या जिवाला फार लागली असती ही गोष्ट, मी तुमच्याकडे भक्तिप्रेमानंच पाहीन. मला जगाशी काय करायचं आहे? माझं सारं धन म्हणजे तुम्ही. तुम्ही माझं सर्वस्व. तुम्ही निर्मळ व निष्पाप असलेत म्हणजे झालं. तुम्ही निष्कलंक असलेत म्हणजे झाले. का? अशी का करता मुद्रा? काय होतं तुम्हांला? का आले डोळे भरून? नका हो रडू. मनाला इतकं लावून नये घेऊ. बाकी भावाला असा अपघाती मृत्यू यावा याचं वाईट वाटणारच. परंतु आपला काय इलाज?"


५० *मनूबाबा