पान:मनतरंग.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देवीला फुलांची छत्री चढवतात. मी त्यांच्यात मिसळून काही महिलांना विचारले की ख्रिश्चन असूनही ही प्रथा कशी ?
 "आमचे पूर्वज याच मातीतून जन्मले. याच मातीत मिसळून गेले. आमच्या पूर्वजांची देवी हीच. काळाच्या ओघात आमचे पूर्वज ख्रिश्चन झाले. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न धर्मधुरीणांनी कधी केलाच नाही ?
 "विहिरीत पाव टाकलेले पाणी प्यायले म्हणून पूर्वज ख्रिस्ती झाले. पण असे पाणी प्यायल्याने माणसाचा धर्म बदलत नाही, त्याची संस्कृती... जीवन पद्धती बदलत नाही, असा विश्वास दिला का कोणी त्यांना?"
 "आमच्या मनातली या मातीबद्दलची, या देवीबद्दलची श्रद्धा नाहीशी कशी होणार?" मला मिळालेले उत्तर.
 ...संघर्ष, समन्वय आणि समरसता यातून 'वसुधैव कुटुंबकम' भूमिका घेणारी, विश्वात्मक परमेश्वराला 'जो जे वांछील तो ते लाहो' असे प्रार्थणारी आमची भारतीय संस्कृती...

■ ■ ■

मनतरंग / ९४