पान:भोवरा (Bhovara).pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८२ / भोवरा

द्वारकेतील यादवांचा हृदयद्रावक अंत इतका अपूर्व सांगितला आहे की एकदा वाचल्यावर विसरणे शक्य नाही. पण या कथेपेक्षा हरिवंशातील कथा जास्त वास्तव वाटते. यादव पुरुष दारू पिऊन आपापसांत झगडून मेले व स्त्रिया, म्हातारे व बालके फक्त नगरात राहिली. स्वतः मरण्याच्या आधी श्रीकृष्णाने अर्जुनाला झाल्या प्रकाराचा निरोप पाठवण्याची सोय केली. तो निरोप पोचल्यावर अर्जुन आला. त्याने वसुदेवाचे सांत्वन केले. सर्व मृत यादवांना अग्नी दिला. कृष्ण-बलरामांची कलेवरे शोधून काढून त्यांनाही अग्नी दिला व उरलेल्या सर्वांना घेऊन हस्तिनापुराकडे निघाला. वाटेत पंचनद्यांच्या प्रदेशात काही यादवस्त्रिया आपणहून अभीरांकडे गेल्या; व काही त्यांनी पळवल्या. उरलेल्या घेऊन अर्जुन हस्तिनापुराला आला. त्याने श्रीकृष्णाचा नातू जो वज्र त्याला इंद्रप्रस्थाचे राज्य दिले व उरलेल्या यादवांना तेथे राहण्यास जागा दिली. ज्या क्षणी अर्जुन शेष यादवांना घेऊन बाहेर निघाला, त्याच क्षणी समुद्राची मोठी लाट येऊन द्वारका नाहीशी झाली.
 जैनमताप्रमाणे द्वारकेला प्रचंड आग लागली; महाभारताप्रमाणे द्वारका समुद्रात गेली. खरे काय झाले माहीत नाही. सध्या ज्याला 'द्वारका' क्षेत्र म्हणतात ती खरी द्वारका नसून प्रभासपट्टणशेजारी समुद्रात एक लहानशा टेकडीवजा उंचवटा आहे, ती द्वारका होय, असेही मत आहे. द्वारकेशेजारी रैवतक पर्वत होता असे हरिवंश व जैन ग्रंथकार एकमताने सांगतात. हा रैवतक पर्वत म्हणजेच जुनागढ शेजारचा गिरनार; व तेथेच नेमिनाथ निर्वाणपदाला गेले असे म्हणतात. त्या भागात उत्खनन केले असता ख्रिस्त शकासुमाराचे व त्या आधीचेही जुने अवशेष सापडले आहेत व आणखीही सापडण्याचा चांगलाच संभव आहे. तेथील समुद्रकिनाऱ्यावर कदाचित जुन्या द्वारकेचा पत्ताही लागेल.
 पर्शियन आखातापासून तो काठेवाडपर्यंतच्या भागात अजूनही धरणीकंपाचे धक्के बसतात. येथे समुद्रात ज्वालामुखी पर्वत असून अधूनमधून त्याच्या स्फोटाने किनाऱ्याजवळील जमीन हादरते व समुद्रात प्रचंड लाटा उसळून त्या किनाऱ्यावर आदळल्या की कोळ्यांची गावेच्या गावे गिळून टाकतात. नुकताच दोन वर्षांपूर्वी तसा धरणीकंप होऊन कराचीशेजारच्या शंभर मैल किनाऱ्यावरील कोळीवाडे समुद्राच्या पर्वतप्राय लाटांनी नष्ट झाल्याचे वर्तमान सर्वांनी वाचले असेलच.